Team Agrowon
चंद्रावर मानवी वसाहती उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या संशोधकांनी भविष्यामध्ये तिथे शेती करायला सुरुवात केली तर आश्चर्य वाटायला नको.
‘अपोलो’ मोहिमेअंतर्गत पृथ्वीवर आणण्यात आलेल्या चंद्रावरील मातीमध्ये संशोधकांनी प्रथमच यशस्वीरीत्या वृक्षारोपण केले आहे, त्यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना अवकाशामध्येच अन्न आणि ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल.
अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी चंद्रावरून आणण्यात आलेल्या मातीमध्येही रोपटे वाढू शकते, हे सप्रमाण सिद्ध केले आहे.
हे संशोधन ‘जर्नल कम्युनिकेशन्स बॉयॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. चंद्राच्या मातीला रोपटे कशा पद्धतीने प्रतिसाद देते हेदेखील संशोधकांनी पडताळून पाहिले आहे.
चंद्र आणि पृथ्वीवरील मातीमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो, चंद्रावरील मातीमध्ये बारीक खडकाचाही समावेश असतो असे असतानाही त्यामध्ये बीजाला अंकुर फुटू शकतात हे सिद्ध झाले आहे.
अंतराळामध्ये वनस्पतीची कशा पद्धतीने वाढ होती? हे पडताळून पाहण्यासाठी ‘नासा’च्या संशोधकांनी ‘आर्टिमीस प्रोग्रॅम’ची आखणी केली आहे असे ‘यूएफ इन्स्टिट्यूट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर सायन्सेस’मधील संशोधक रॉब फेर्ल यांनी सांगितले.