Team Agrowon
दुधाळ जनावर माजावर आल्यानंतर पशुपालक बऱ्याचदा जनावर गाभण राहण्याच्या सर्व प्रक्रियांचे पालन करतात.
पण काही ना काही कारणांमुळे जनावर गाभण राहत नाही. जनावर गाभण राहिलं की नाही हे तपासणी केल्याशिवाय पशुपालकाला समजत नाही.
पशुपालकाला जनावर गाभण राहिले नाही हे समजेपर्यंत जनावराचा गाभण राहण्याचा काळ निघून गेलेला असतो. जनावर वेळीच गाभण राहिलं नाही, तर पशुपालकाला आर्थिक नुकसान सोसावे लागते.
जनावरांच्या गर्भधारणेबाबत पशुपालक कायम चिंता व्यक्त करताना दिसतात. कारण ग्रामीण भागात जनावराची गर्भधारणा तपासणी सुमारे ३ते ४ महिन्यांनी केली जाते.
जनावराची गर्भधारणा २० दिवसांनी तपासली, तर त्यांना फायदा होऊ शकतो. कारण जर जनावर गाभण राहिले नसेल तर त्यावर वेळीच उपाययोजना करता येतात.
पशुपालकांची गरज लक्षात घेता केंद्रीय म्हैस संशोधन संस्था, हिसार (सीआयआरबी) आणि भारत सरकारच्या बायोटेक्नोलॉजी विभागाने 'प्रेग डी कीट' तयार केले आहे.
या किटच्या मदतीने आता पशुपालकाला आपल्या जनावराची गर्भधारणा तपासणी करू शकतील. केवळ १० रुपयांच्या या किटच्या मदतीने पशुपालक स्वत: घरच्या घरी जनावराच्या गर्भधारणेची तपासणी करू शकणार आहे.
जनावराच्या गर्भधारणेची तपासणी करण्यासाठी या किटवर गाय किंवा म्हशीचे मुत्र टाकावे लागते. जनावर गाभण राहिले असल्यास किटचा रंग गडद लाल किंवा जांभळा होतो.
परंतु जर किटचा रंग पिवळा किंवा हलका दिसत असेल, तर जनावर गाभण राहिले नाही, असे समजावे.