Team Agrowon
जूनमध्ये पावसाच्या आगमनासोबतच केळीच्या रोप लागवडीला वेग येतो.
यंदा पाऊस अद्यापही आला नसल्याने वातावरण उष्ण आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी केळी रोप लागवडीला सुरुवात केली नसल्याची स्थिती आहे.
अकोला जिल्ह्यात दरवर्षी लाखो केळी रोपांची लागवड होते. केळीचे चार ते पाच हजार एकरांपेक्षा अधिक लागवड क्षेत्र आहे.
प्रामुख्याने अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी या तालुक्यांत केळीचे क्षेत्र आहे. त्यातही अकोटमध्ये पणज, अकोलखेड व इतर लगतची काही गावे ही केळीचे माहेरघर बनली आहेत.
यंदा सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टिश्यू कल्चर रोपांची बुकिंग केली. काही कंपन्यांनी रोपांचा पुरवठासुद्धा केला आहे.
लागवडीच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी तयारीसुद्धा केली. मात्र अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही.
तापमान दररोज ४२ ते ४२ अंशापर्यंत राहत आहे. अशातच रोपे लावली, तर नुकसान होण्याचीच शक्यता अधिक आहे.
परिणामी, शेतकऱ्यांनी आणलेली रोपे तशीच ठेवली आहेत. काही मोजक्या शेतकऱ्यांनी धाडस करून लागवड सुरू केली आहे.