Team Agrowon
लागवडीसाठी पावसाळा (जुलै-ऑगस्ट) हा सर्वोत्तम काळ आहे. तथापि, सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास वसंत ऋतूमध्ये ही लागवड करता येते.
उत्तर भारतामध्ये विशेषतः कोरडवाहू भागासाठी बेल फळ एक वरदान म्हणून पाहिले जाते. सामान्यपणे ६ × ६ मीटर , ८ × ८ मीटर किंवा १० × ६ मीटरवर लागवड केली जाते. शेती बांधावर ५ ते १० मीटर अंतरावर लागवड करावी.
पर्णपाती असल्यामुळे आंतरपिकांसाठी बेल हा उत्तम वृक्ष आहे. पहिल्या पाच वर्षांपर्यंत आंतरपीक म्हणून विविध प्रकारची कडधान्ये, तेलबिया किंवा नगदी पिके घेतली जातात. उत्तर भारतात खरीपमध्ये मूग किंवा उडीद घेऊन रब्बीमध्ये गहू, मोहरी व मसूर लागवड करतात.
आंतरपिकांमुळे आर्थिक उत्पन्न मिळते. बागेला अतिरिक्त पाणी व खते देण्याची गरज उद्भवत नाही.
बियांपासून तयार केलेल्या रोपांपासून उशिरा म्हणजेच ७ ते १० वर्षांनी फळे लागण्यास सुरुवात होते. कलमांपासून ४ ते ५ वर्षांनंतर फळे येतात. साधारणपणे फुले एप्रिल-मे महिन्यात येतात, फुलांपासून ते फळे परिपक्व होण्यासाठी सुमारे ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो.
दहा वर्षांच्या झाडापासून १०० ते १५० फळे प्रति झाड किंवा १८ ते २० टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
फळे काढताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फळे २ ते ३ सेंमी देठ ठेवून काढावीत.