Team Agrowon
उजनी जलाशयाचे खास आकर्षण असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून धरण काठावर येतात
. हे पक्षी नुकतेच जलाशयावर येऊन दाखल झाल्याची नोंद पक्षी अभ्यासकांनी केली आहे.
सुमारे पन्नासहून अधिक संख्येने आलेले फ्लेमिंगो पक्षी धरण परिसरातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव, शिंदेवस्ती, काळेवाडी, कुंभारगाव आदी शिवारातील फुगवठ्यावर दाखल झाले आहेत.
पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखूड व वक्राकार केशरी चोच, गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे फ्लेमिंगोची वैशिष्ट्ये आहेत.
या पक्ष्यांचा पंखाखालील भाग रक्तवर्णीय असतो व ते आकाशात झेप घेतल्यानंतर गडद लाल रंगाचे पंख ज्वाळाप्रमाणे दिसतात.
हा पक्षी अग्निपंख या नावानेही ओळखला जातो. ज्यावेळी हे पक्षी उथळ पाण्यात उभारलेले असतात तेव्हा ते गुलाबी रंगमिश्रित धवलवर्णीय दिसतात व या कारणामुळे रोहित पक्षी या नावाने हे पक्षी ओळखले जातात.
स्थलांतरित पक्ष्यांचा चराऊ भाग पाण्याखाली गेल्यामुळे पक्षी आपल्या प्रवासाचे वेळापत्रक बदलून आगमन लांबणीवर टाकतील, असे वाटत असताना पक्ष्यांनी यंदा लवकर स्थलांतर केले आहे.
गेल्या दशकापासून वातावरणातील अस्थिरतेमुळे या पक्ष्यांच्या नियोजित वेळापत्रक कोलमडून ते कधी लवकर तर कधी उशिरा येतात.
सतत बदलणाऱ्या हवामानातही फ्लेमिंगो उजनीवर येऊन दाखल झाल्याने उजनीचे सौंदर्य वाढले आहे.
Alu Cultivation : आरोग्यदायी अळूची लागवड कशी करावी?