Team Agrowon
कृषी विभागामार्फत आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत पंतप्रधान भारत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२४-२५ या ५ वर्षांच्या कालावधीत राज्य व केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
सध्या कार्यरत असलेल्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार करण्यास प्रोत्साहन देण्यासोबतच नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेंतर्गत अर्थसहाय दिले जात आहे.
नगर जिल्ह्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात २४९ सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी या योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेतून कर्ज मिळावे यासाठी १९८१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
वैयक्तिक लाभार्थी, बेरोजगार युवक- युवती, महिला, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, अशासकीय संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
स्वयंसहायता गट, उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त ३ कोटी अनुदान दिले जाते.
बेरोजगार युवक-युवतींच्या आर्थिक संपन्नतेसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.