Team Agrowon
उन्हाळ्यात जनावरांची भूक मंदावते, जनावर धापा टाकते, दूध आणि दुधातील फॅट व एसएनएफ कमी होतो. तसेच पोटातील आम्लता वाढण्याची शक्यता असते.
उष्णतेमुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन ते माजावर येऊन गाभण राहण्याची शक्यताही कमी होते.
गाई, म्हशींचे दूध उत्पादन टिकवणे हे उन्हाळ्यात कसोटीचे ठरते यासाठी उन्हाळ्यातील दिवसात जनावरांच्या आहार व व्यवस्थापनात बदल करावे लागतात.
जनावरांना पिण्यासाठी अतिरिक्त पाणी द्यावे, जेणेकरून दूध उत्पादन व शरीराची गरज भागवली जाऊ शकेल. स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवता येते.
पिण्याच्या पाण्यामध्ये बर्फ टाकून असे गार पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा दूध उत्पादनावर अतिशय चांगला परिणाम दिसून आला आहे.
गाई, म्हशींना अतिरिक्त ऊर्जा असलेला आहार द्यावा जेणेकरून भूक मंदावली असली तरी जरुरी कॅलरीज त्यांना मिळून उत्पादनावर परिणाम होणार नाही. यासाठी मका किंवा गहू ऐवजी बायपास फॅटचा वापर करावा.
जास्त स्टार्च किंवा कर्बोदके असलेला आहार हा किण्वन पोटामध्ये (रुमेन) अतिरिक्त आम्ल उत्पन्न करीत असल्यामुळे पचनास अडथळे निर्माण करतो.