Team Agrowon
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवारांसह नऊ राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राजभवनामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बंडामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून नव्या राजकीय समीकरणांनी जन्म घेतला आहे.
आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.
अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे-फडणवीस सरकाचे बळ वाढल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही शपथ घेतली आहे.
अजित पवार यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच भाजप आणि शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती.
रविवारी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीतील आमदारांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह अमोल कोल्हेही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार आदिती तटकरे यांनीही शपथ घेतल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकमेव महिला मंत्र्याचा समावेश झाला आहे.