महारुद्र मंगनाळे
काल सायंकाळी सहाच्या सुमारास शिरूरला पोचलो तेव्हा जोरदार पाऊस पडून गेलेला.नरेशने कसरत करीत चार चाकी कशीबशी शेतात आणली.रस्त्यावर सगळीकडं चिखल.जागोजाग पाणी साचलेलं.
डोंगरातून येणाऱ्या ओढ्यातून गढूळ पाणी आलेलं.मी अंदाज केला,१५ मि.मी.पाऊस झाला असावा.बॅग ठेवून शेततळ्यावर दहा मिनिटे फिरलो.चपलेला चिखल पकडत होता.परत येऊन जेवण केलं.
आठ वाजताच डाटा बंद करून मच्छरदाणीत आडवा झालो.थकव्यामुळं झोपून गेलो.एका पक्ष्याच्या अनोळखी आवाजाने जाग आली.पहाटेचे साडे- चार वाजले होते.
ही काही पक्ष्यांनी किलबिलाट करायची वेळ नव्हती.त्याची काहीतरी अडचण असावी.पाणी पिऊन तसाच पडलो.तासाभराने विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला.बहूतेक सगळे ओळखीचे ध्वनी.
काही वेळात उठलो.फ्रेश होऊन शेततळ्यावर पोचलो.तिथले आवाज ऐकून मी हादरलोच.किमान पन्नास - साठ बेडकांचे डऱ्यावं...डऱ्याव सुरू होतं.नुसता कलकलाट.मला पहिला प्रश्न पडला,ही एवढी बेडकं अचानक शेततळ्यात गेली कशी?
आतापर्यंत काही बेडकं दिसत होती पण ही तर शेकड्यांवर होती.आरडाओरडा करीत त्यांचा हनिमून चालू होता.हे दृश्य पावसाळ्यात कुठल्याही पाण्याच्या डबक्यात हमखास बघायला मिळते.