Team Agrowon
ज्येष्ठ साहित्यिक आणि रानकवी ना. धों. महानोर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी पळसखेड (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील त्यांच्या ‘सुलोचना बाग’ या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी सामाजिक, राजकीय, साहित्य क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन साश्रू नयनांनी निरोप दिला.
महानोर यांचे ज्येष्ठ पुत्र बाळासाहेब महानोर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. या वेळी त्यांचा लहान मुलगा गोपाळ, कन्या मीरा, रत्ना, सरला, नातू शशिकांत, निनाद, ऋचा, मुक्ता आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. कुटुंबीय, महानोर यांच्यावर प्रेम करणाऱ्या स्नेही मंडळीला या वेळी अश्रू अनावर झाले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जैन समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कवी चंद्रकांत पाटील, दा. सु. वैद्य, रंगनाथ पठारे, सुमती लांडे, जळगाव येथील उद्योजक राजा मयूर, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
अरुण गुजराथी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘‘एक चांगला सहकारी म्हणून महानोर स्मरणात आहेत. त्यांनी शेती, मातीचे प्रश्न मांडले.’’ अशोक जैन म्हणाले, ‘‘महानोर दादांच्या जाण्याने निसर्गाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्याशी जैन परिवाराचे ऋणानुबंध होते.’’
शेवटच्या वेळेतही पीक पाहण्याची इच्छा
महानोर यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वेळेसही शेतात जाऊन पीक पाहण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. वर्षातील कमाल दिवस ते आपल्या ‘सुलोचना बाग’ या शेतातील घरी वास्तव्यास असायचे. तेथेच त्यांना भेटण्यासाठी साहित्यिक व इतर मंडळी यायची. त्यांचे शेती, मातीवरचे प्रेम लक्षात घेऊन त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.