Team Agrowon
सांगली जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे भीषण टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांचे आवर्तन सुरू आहे.
या आवर्तनामधून टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी १३० तलाव पाण्याने भरून घेण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २४१ गावांतील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात यंदा वळीव पावसाने दडी मारली. त्यातच वाढती उन्हाची तीव्रता यामुळे भूजल पातळी कमी होत चालली आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मे, जून, जुलैचा प्रस्ताव दिला असून जुलै ते ऑगस्टदरम्यानचा विशेष कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.
त्यानुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी व तलावाजवळचा उद्भव असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना सुरू राहण्यासाठी जत, मिरज, कवठे महांकाळ, आटपाडी, तासगाव, खानापूर, कडेगावात सिंचनच्या लाभक्षेत्रातील तलावांत पाणी सोडण्यात येणार आहे.
टंचाई स्थितीत सिंचन योजनांचे पाणी लाभक्षेत्रातील तलावांमध्ये सोडण्याबाबत प्रस्ताव सादर करून पिण्यासाठी आरक्षित केले जाते.
त्यासाठी उपसा सिंचन योजनेच्या वीजबिलाची तरतूद पाणी टंचाई आराखड्यात करून शासनाकडून अनुदान आल्यानंतर पाटबंधारे विभागाकडे रक्कम वर्ग केली जाते.