गतवर्षी डिसेंबरमध्ये हंडरगुळीच्या (जि. लातूर) बाजारात एक मुरा म्हैस नजरेत भरली. म्हशीचा मालक अंबादास हा शेतमजूर.चारा-पाण्याचा प्रश्न अवघड म्हणूनच तो म्हशीला विक्रीसाठी घेऊन आला होता. माझे मित्र व बाजारातील दलाल अशोक पाटील (Ashok patil) यांच्या परिचयातला होता. अंबादास म्हणाला, ``दोन महिन्यापूर्वी एकदा हाल्या लावलाय,भरवलयं बी. पण म्हैस गाबण हाय का नाही ते मला माहित नाही.`` माझे शेतातले सहकारी भरतमामा खाली (गाभण नसलेली) मुरा म्हैस (Murrah Buffalo) घ्यायला फारसे उत्सूक नव्हते. पण पाटलांचा आग्रह होता- खाली समजून घ्या सर. ही म्हैस चांगले पैसे मिळवून देईल. त्यांचं म्हणणं मला पटलं. मी ३५ हजाराला म्हैस घेतली. म्हैस शांत, खावड. दिसायला छान. देखणी म्हणावी अशी. समोर कोणतंही खाद्य टाका, चकाचक करणार. जनावर खावड असलं की, अंगानं भरत. महिनाभरात म्हैस आणखी जाडजूड झाली. आखाड्याची शान वाढली.
हेही पाहा-Sickle Shape आकाराची शिंगे असलेली म्हैस
गावचा सरकारी पशूचा दवाखाना माझ्या शेतापासून दिड किलोमिटरवर आहे. तिथं जनावर न्यायचं म्हटलं की, दोन माणसांचे तीन तास जातात. ते परवडत नाही. गावातले माझे जुने मित्र शिवाजी गुळवे हे व्हेटरनरी डिप्लोमाधारक (Veternary Diploma). गेल्या चाळीस वर्षांपासून खासगी सेवा पुरवतात. फोन केला की, शेतात येऊन म्हशी तपासतात. म्हशी भरवणे, तपासणे, छोटे-मोठे आजार तेच बघतात. औषधं देतात. आमच्या शेतात त्यांच्या महिन्यातून दोन -तीन चकरा असतात. एका चक्करमध्ये गुळवेंनी मुरा म्हैस तपासली.अडिच महिने झाल्याचं सांगितलं. भरतमामा खुष झाले. मी तारीख नोंदवून ठेवली. मुरा म्हशीकडं विशेष लक्ष दिलं जाऊ लागलं. दिवसेदिवस ती जास्तच आकर्षक दिसू लागली. म्हैस किती रुपयापर्यंत विकली जाईल याचे अंदाज बांधले जाऊ लागले. भरतमामांनी ९० हजाराचा अंदाज बांधला. मी हे सगळं ऐकत होतो. म्हैस व्यायला आणखी बराच कालावधी होता.
हेही वाचा- भारताच्या दूध, अंडी उत्पादनात वाढ
मी नोंदवलेल्या तारखेप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुऱ्हाला नववा महिना सुरू झाला. सप्टेबरच्या सुरूवातीला ती वासराला जन्म देईल असं गणित होतं. जनावराचा कास सांगतो की, ती कधी व्याणार. जुलै अखेरला हंडरगुळीहून अशोक पाटीलही शेतात येऊन गेले. ``सर ,घाई करू नका. मला बोलल्याशिवाय कोणाला शब्द देऊ नका. चांगले पैसे येणार आहेत म्हशीचे,`` पाटील म्हणाले. मी होकार दिला. महिन्यापेक्षा अधिक कालावधी असल्याने आम्ही निश्चिंत होतो.
हेही वाचा- कोणती कोंबडी देते सर्वात जास्त अंडी ?
इसाकभाई नावाचे व्यापारी ६ ऑगस्टला वगारी विकत घेण्यासाठी शेतात आले. दोन वगारी घेतल्या. जाताना मुऱ्हा म्हशीकडं बघत ते म्हणाले, ``सर, ही म्हैस दोन दिवसात हाळजत्याय बघा. आकुडे मोडलेत.`` मी म्हटलं, तारखेप्रमाणं आणखी एक महिना वेळ आहे. शिवाय अजिबात कास केली नाही. पण `म्हैस विणारच बघा...` म्हणत इसाकभाई गेले. मी भरतमामाशी चर्चा केली. आकुडे मोडलेले दिसत होते. पण आम्ही नोंदवलेली तारीख हे मान्य करू देत नव्हती. शिवाय कास बघूनच म्हशीला किमत येणार होती. त्यामुळे तातडीनं बाजारला नेऊनही उपयोग नव्हता. बघू काय होईल ते म्हणत आम्ही विषय संपवला. भरतमामांनी ८ ऑगस्टला सकाळी सहाच्या आतच दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडल्याबरोबर मामा नाराजीच्या सुरात बोलले, ``सर, म्हैस ईली बघा...वगार दिलीय..``
मी लगेच गोठ्याकडं गेलो. बघितलं. अर्धवट जार लोंबत होता. वगार अपेक्षेपेक्षा बरीच छोटी वाटली. नाराज झालो. दोन्ही वेळेला एकेक लिटर दुध देणारी म्हैस असताना ही दुधाची म्हैस आता नको होती. पण इलाज नव्हता. सकाळीच अशोक पाटलांना फोनवर ही माहिती सांगितली. ``पंधरा-वीस दिवस म्हैस सांभाळा सर. चांगला खुराक, कॅल्शियम पावडर द्या.चार लिटरवर आली की सांगा. गिऱ्हाईक तयार आहे,`` ते म्हणाले.
त्या दिवशी जार पडावा म्हणून म्हशीला कोरडी ज्वारी, कडबा खाऊ घातला. पाच-सहा तास उलटले तरी तेवढाच जार लोंबत होता. डॉ. शिवाजी गुळवेंना फोन केला. त्यांनी बरीच इंजेक्शन दिली. गर्भाशयात गोळ्या सोडल्या. हंडरगुळीचे जुने जाणते व्हेटरनरी डॉक्टर दाबके यांना फोन केला. ते म्हणाले, ``जार पडंलंच...अन् नाही पडला तरी काही फरक पडत नाही. उगीच काळजी करू नका.`` सकाळी मामांनी पाऊण लिटर चीक(कच्चं दुध)काढलं. वासराला थोडंसं दुध पाजलं. संध्याकाळी म्हैस वासरू प्यायचा प्रयत्न केला तरी पान्हा सोडेना. सकाळी पण तिचं स्थिती. मामांनी झटून ग्लासभर दुध काढलं. म्हैस शेणाबरोबर लालसर घाण पाणी बाहेर काढू लागली. पुन्हा चिंता वाढली. अशोक पाटलांना बोललो. ते दुसऱ्या दिवशी डॉ.दाबकेंना घेऊन आले. त्यांनी गर्भाशयात हात घालून तपासणी केली. आत जार नाही, याची खात्री देऊन गर्भाशयात औषधं सोडली. वेगवेगळी चार-पाच इंजेक्शन दिली. गोळ्या,पावडर लिहून दिली. म्हैस वेणा द्यायची तेव्हा तिचं मायांग बाहेर यायचं. याला भांडं बाहेर पडणं म्हणतात. ती भीती नको म्हणून डॉक्टरांनी तिथं टाके घाले. दोन दिवसातही फारसा फरक पडला नाही.
माझा दिल्लीचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने, जमेल ते डॉक्टरी उपाय करा, असं सांगून मी गेलो. प्रवासात असतानाही सगळं लक्ष म्हशीच्या तब्येतीकडं होतं. माझ्या पश्चात डॉ. गुळवे पुन्हा येऊन गेले. गर्भाशयात जार असल्याची शंका असल्याने, त्यांनी पुन्हा हात घालून तपासणी केली. औषध, गोळ्या दिल्या. म्हैस पांजण्यासाठीची इंजेक्शन्स दिली. त्यामुळे म्हैस अर्धा लिटर दुध देऊ लागली. पण म्हशीला वासराचा अजिबात लळा वाटेना. इंजेक्शन दिलं की, तेवढ्यापुरता पान्हा सुटायचा. डॉ. गुळवेंनी सल्ला दिला की, म्हशीच्या तब्येतीबाबत चिंता वाटते; विमा काढावा. माझ्या गैरहजेरीत लगेच बायकोची कागदपत्रे देऊन, ३३०० रु. भरून ६० हजाराचा विमा काढला. मनातली थोडी भीती कमी झाली. पण या सगळ्या डॉक्टरी उपचारांचा फारसा उपयोग होत नव्हता. म्हैस वासराला आपलं लेकरू मानायला तयार नव्हती. आमचे शेजारचे शेतकरी बबनराव बिलापटे यांना म्हशीची ही समस्या कळली. त्यांनी नरेशला शिरूरलगतच्या बोडका येथील कानवटे यांचा फोन नंबर देऊन, त्यांना घेऊन येण्याची सूचना केली. नरेशने फोनवर मला विचारणा केली. मी सांगितले, जे शक्य आहेत ते उपाय करून बघा. नरेश कानवटे मामांना घेऊन आला. त्यांनी म्हशीच्या गर्भाशयात काहीतरी आर्युवेदिक औषध सोडलं. लगेच ती वेण देऊ लागली अन् पाच मिनिटात तिनं पान्हा सोडला. म्हैस वासराला पिऊ देऊ लागली. मामांनी लिटरभर दुध काढलं. मी ऋषीकेशला असताना, नरेशने फोनवर मला ही माहिती सांगितली. मी सुस्कारा सोडला. दोन दिवसात मी शेतात परतलो. कानवटे यांनी सांगिचल्याप्रमाणं हरभऱ्याचा भरडा, गुळ म्हशीला सुरू केलं. आठवडाभरात दोन लिटरपेक्षा अधिक दुध निघू लागलं.
गावातल्या एका डेअरीवर दोन टाईमचं पाच लिटरच्या आसपास दुध पाठवलं. दुधाला सदतीस रूपये भाव लागला. दोन दिवस दुध पाठवल्यानंतर संशय बळावल्याने शेतात मोजून पाच लिटर दुध पाठवलं. डेअरीच्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर ते चार लिटरच भरलं. नरेशने पावती दाखवली. चोरी दिसत होती. ती उघडी करणं म्हणजे एका मोठ्या भ्रष्ट साखळीशी लढणं होतं. यातून फारसं काही निष्पन्न होण्याची शक्यता नव्हती. मन:स्तापाबरोबर वेळ वाया घालवणं होतं. डेअरीचं दुध बंद केलं. एका हॉटेलला ५० रु. लिटरने पाच लिटर दुध देणं सुरू केलंय. ते किती दिवस चालेल ते माहित नाही. म्हशीला भरपूर चंदी, हिरवा मका, गवत आहे. महिना संपला तरी एका वेळेला तीन लिटरपेक्षा कमी दुध निघतेय. ती चार लिटरवर येण्याची शक्यता नसल्याने, या म्हशीला सांभाळण्याचा आम्ही निर्णय घेतला. जमेची बाब म्हणजे, मुऱ्हा जातीची असूनही दुध घट्ट, चवदार आहे. तुपाला चांगली आहे.
मध्येच मुऱ्हाच्या या वगारीला अचानक प्रचंड गोचीड झाले. गळ्याच्या खालच्या बाजुला शेकडो गोचीड चिटकले होते. तातडीने रक्षक औषध लावलं. दुसरीही औषधं लावली. तेव्हा गोचीड मेले. पण त्यामुळं वगाराच्या गळ्याला जखमा झाल्या. त्याच्यावर उपचार चालू आहेत. दोन दिवस दुर्लक्ष झालं असतं तर, वगार दगावलं असतं.
ज्यांच्या खासगी उपचारामुळे म्हैस आजारातून बाहेर आली, त्या श्रीराम दिगंबर कानवटे यांना मी रुद्राहटला मुद्दाम बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या आजोबापासून हे औषध देणं चालू आहे. वासरांना पान्हा न सोडणाऱ्या शेकडो म्हशींवर त्यांनी आजपर्यंत यशस्वी उपचार केले आहेत.
`दुधाचा धंदा म्हणजे शेतकऱ्यांना वरदान. हा धंदा सहज कोणीही करू शकतो. यात कसलीच रिस्क नाही. या धंद्यावर पोट भरू शकतं. शेतकऱ्यांनी जोडधंदा केला पाहिजे...` हे रंगवलं जाणारं चित्र खरं नाही. शेतीइतकीच शेतीआधारीत जोडधंद्यातही रिस्क आहे. पावलोपावली फसवणूक, अडवणूक आहे. मी या म्हशीवर विम्यासहित जवळपास दहा हजार रुपये खर्च केले. केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला हा खर्च करणे शक्य होत नाही. एवढ्या जोखमीने दुध उत्पादन करूनही, हे दुध शेतकऱ्यांना ग्राहकांच्या दारात घेऊन जावे लागते, ही भारतीय शेतीची व शेतीआधारीत जोडधंद्यांची शोकांतिका आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.