बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे महत्त्व 
ॲग्रो गाईड

बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे महत्त्व

डॉ. सतीश करंडे

संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न सुरक्षा विषयक अहवालामध्ये कृषी क्षेत्रातील जैवविविधता वेगाने कमी होत असल्याची बाब अधोरेखित केली असून, त्याचा विपरीत परिणाम अन्नसुरक्षा आणि पोषण सुरक्षा या दोन्हीवर होणार असल्याचा इशारा दिला आहे. कृषी जैवविविधतेमध्ये पिकांच्या विविधतेबरोबरच शेतातील सूक्ष्मजीव, सजीव, माती आणि आनुषंगिक परिस्थितिकीशी याचा समावेश होतो. एका अभ्यासानुसार विश्वामध्ये सुमारे १३ लाख जीवजंतू म्हणजेच वनस्पती, प्राणी सूक्ष्मजीव आहेत. त्यांपैकी आपल्याला केवळ १.७५ लाख जीवजंतूची ओळख झाली आहे. शेतामध्ये एखाद्या पिकाची लागवड केली जाते, त्या वेळी त्या पिकाच्या सोबतीने वाढणारी जीवजंतूची एक परिस्थितिकी तयार होत असते. या परिस्थितिकीच्या क्रियाशीलतेवर त्या पिकाचे उत्पादन अवलंबून असते. उदाहरणात, परागीभवनासाठी आवश्यक असणारे कीटक, आवश्यक मूलद्रव्ये मिळण्यासाठी कारणीभूत ठरणारे मातीतील सूक्ष्मजीव, त्या पिकावर येणाऱ्या कीटकांमध्ये शत्रू किडी व मित्र किटक अशा अनेक घटकांचा समावेश असतो. त्यातून त्या पिकाची उत्पादनक्षमता ठरण्यास मदत होते. गेल्या काही वर्षामध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यातही पाणी, हवा, माती यामध्ये प्रदूषित घटक पिकांवर म्हणजेच एकूण कृषीजैवविविधतेवर विपरीत परिणाम करतात. एक सलग पिकांच्या लागवडीमुळे लागवड, व्यवस्थापन आणि काढणी हे यंत्राद्वारे करणे शक्य होत असले तरी त्यामुळे पिकांची जैवविविधता कमी होत गेली आहे. जागतिक पातळीवरील लोकांच्या आहाराचा विचार केला असता त्यांना मिळणाऱ्या ६० टक्के कॅलरी केवळ भात, गहू आणि मका या तीन अन्नधान्यातून मिळतात. केवळ तीन पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले असून, अन्य पिके दुर्लक्षित राहिली आहेत. बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने उपकारक ठरणारी ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळे, हुलगा आदी अनेक पिके दिवसेंदिवस कमी होत गेली आहेत. व्यापारी व व्यावहारिक दृष्टिकोनातून शेती करताना मागणी असलेली पिके पिकवण्याकडे सर्वांचा कल आहे. त्यातही हमीभावासारख्या योजना, मजुरांची कमी गरज असलेली पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. हा केवळ भारतातील अनुभव आहे, असे नव्हे तर जगभरातील आहे. जगभरातील तज्ज्ञ कृषिजैवविविधता कमी होण्याकडे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. हवामान बदल आणि कृषिजैवविविधता : हवामान बदलाचे संकटाने अनेक ठिकाणी आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. काही विभागामध्ये संपूर्ण शेती क्षेत्र धोक्यात आले आहे, तर काही ठिकाणी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. एकतर आपल्या आहारातील अन्नधान्यांचे प्रमाण मोजक्या पातळीवर स्थिरावले आहे. त्या पिकातही ठरावीक दोन तीन सुधारित किंवा संकरित वाणांची लागवड मोठ्या क्षेत्रावर होत आहे. वर्षानुवर्षे एकाच पिकाची लागवड होत असल्याने त्या पिकातील अनुकूल परिस्थितिकीमुळे कीड रोगांचे प्रमाण वाढले आहे. एका टप्प्यानंतर कीड व रोगांचे प्रमाण नियंत्रण किंवा आवाक्याबाहेर वाढल्याने हळूहळू ते पीक त्या भागातून हद्दपार होते. उदाहरणात, नगर जिल्ह्यातील कोल्हार हे गाव पूर्वी डाळिंबासाठी प्रसिद्ध होते. येथे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने डाळिंब घेणे कठीण झाले. सोलापुरातील शेलगाव परिसरामध्ये पपई हे पीक खूप चांगले येई. मात्र, विविध रोगाच्या प्रादुर्भावाने लोकांना बागाच्या बागा काढून टाकाव्या लागल्या. प्रत्येक पिकाच्या वाढीच्या सत्रामध्ये आवश्यक अनुकूल हवामान ठरलेले होते. त्यानुसार त्यांची लागवड पारंपरिक नक्षत्र, समज यानुसार केली जाई. आपल्या विभागातील पाऊस, थंडी आणि उन्हाळा यांचा अंदाज जाणकार शेतकऱ्यांना असे. आपले पीक यातील कोणत्याही तडाख्यात सापडणार नाही, याचे पारंपरिक आडाखेही ठरलेले असत. मात्र, हवामानातील बदलामुळे अनियमितता वाढली आहे. पारंपरिक समज किंवा आधुनिक तंत्रज्ञानही आडाखे बांधण्यामध्ये थिटे पडत आहे. आज एखाद्या गावामध्ये कोणतीही फवारणी न करता वांग्याचे पीक घेण्याची स्पर्धा ठेवली तर किती शेतकरी त्यात आत्मविश्वासाने उतरतील यात शंकाच आहे. हवामानातील बदलाला पिके काटक होण्याआधीच किडी आणि रोग काटक व सहनशील होत आहे. पिकांमध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीडनाशकांच्या फवारणीनेही त्यांना रोखणे अनेक वेळा अवघड ठरत आहे. जैवविविधता हाच परिणामकारक उपाय अनेक कारणांमुळे कृषी क्षेत्रातील पिकांची जैवविविधता कमी झाली आहे. या घटणाऱ्या जैवविविधतेसोबतच पिकाअंतर्गत उपलब्ध विविध सजीवांची जैवविविधता आणि यंत्रणा कमी होत चालली आहे. जगभरामध्ये पारंपरिक किंवा जंगली जातींवर सातत्याने संशोधन केले जात आहे. त्यातील काटकता, कीड रोगांना प्रतिकारकता यांसारख्या चांगल्या बाबी सध्याच्या पिकांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रदेशानुसार पिकांमध्ये किंवा त्यांच्या जातीमध्ये कदाचित बदल करावे लागतील. उदाहरणात, हवामान बदलामुळे आपल्याकडे तांदळाचा एखादा वाण चांगले उत्पादन देत नाही. मात्र, त्याला पूरक वातावरण चीनमध्ये तयार झाले असल्यास तो वाण तिथे चांगले उत्पादन देऊ शकेल. अशा वातावरणातील बदलानुसार बदलणाऱ्या विविध शक्यतांचा अंदाज घेणे, पडताळून पाहणे यावर अधिक संशोधन केले गेले पाहिजे. संशोधनाचे धोरणच हवामान बदलावर कृषिजैवविविधतेच्या संवर्धनाच्या अनुषंगाने झाल्यास फायदेशीर राहू शकेल, असे वाटते. डॉ. सतीश करंडे, ९९२३४०४६९१ (प्राचार्य, लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT