Mumbai News : नालासोपारा मतदार संघात पैसेवाटपावरून बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना रोखत जोरदार गोंधळ घातला. तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन मतदार संघात येत असल्याची माहिती भाजप नेत्यांनीच दिल्याचा दावा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. या प्रकरणी तावडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही ठाकूर यांनी केली.
दरम्यान, विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तेथे ‘बविआ’च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घालत तावडे यांना चार तास रोखून धरल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. तावडे यांच्या वाहनातील हवाही कार्यकर्त्यांनी सोडल्याने त्यांना हॉटेलबाहेर पडणे अशक्य झाले होते. ‘बविआ’च्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने भाजपने बुक केलेल्या हॉटेलमधील खोल्यांची झडती घेतली.
या वेळी साडेनऊ लाख रुपयांची रोकड सापडल्याचे सांगण्यात आले. तसेच तावडे यांच्याकडे एक डायरी सापडली असून त्या डायरीत बूथनिहाय पैसे वाटपाचे आकडे लिहिले होते. दरम्यान, या प्रकरणी विनोद तावडे आणि राजन नाईक यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नालासोपारा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून हितेंद्र ठाकूर आणि भाजपच्या राजन नाईक यांच्यात लढत होत आहे. मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे वसईजवळील एका हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसह बसले होते. त्या वेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तेथे जात रोख रक्कम आणि काही डायऱ्या ताब्यात घेतल्या.
या वेळी तावडे यांच्या बॅगेतून पाकिटेही काढल्याचा व्हिडिओ आणि पैसेवाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, हितेंद्र ठाकूर आणि उमेदवार क्षितिज ठाकूर हेही हॉटेलमध्ये आले. हे दोघेही आक्रमक झाल्याने तावडे यांना हॉटेलबाहेर पडणे अशक्य झाले.
दरम्यान, तावडे म्हणाले, ‘‘मी येथून जात होतो. मतदान प्रक्रियेविषयी कार्यकर्त्यांना सूचना देत होतो. आमची बैठक सुरू होती.’’ मात्र आचारसंहिता काळात कसली बैठक घेता असा जाब ठाकूर यांनी विचारला. तावडे यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, असे सांगत ठाकूर यांनी तावडे यांना हॉटेलबाहेर नेले. आपण भोजनासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काही वेळातच तावडे यांनी स्पष्टीकरण दिल्याने त्यांना कार्यकर्त्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बाहेर नेल्याचे स्पष्ट झाले.
विरोधकांची कडाडून टीका
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. ‘‘तावडे यांच्याबाबतची माहिती गृहखात्यानेच पाळत ठेवून ठाकूर यांना दिली. तावडे पकडले जातील याची व्यवस्था केली. भाजपने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी खरा चेहरा समोर आला आहे. पक्षाच्या महासचिवाकडे पाच कोटी रुपये आढळून येतात. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भारतीय जनता पक्ष व विनोद तावडे यांच्यावर कठोर कारवाई करावी,’’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
तावडे यांच्याकडे पैसे सापडले असतील तर हे गँगवॉरमधून घडले असावे. निवडणूक आयोगाने कारवाई करावी. तावडे जर तावडीत सापडले असतील तर आजपर्यंत त्यांनी सरकार का पाडले याचा हा पुरावा आहे. हे भाजप आणि शिंदे यांच्यामधील गँगवॉर आहे.उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.