New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने येत्या दोन वर्षांमध्ये २,००० कोटी रुपये खर्चासह ‘मिशन मौसम’ ला मंजुरी दिली. ‘मिशन मौसम’ प्रामुख्याने भू-विज्ञान मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणार असून भारताच्या हवामान आणि हवामानाशी संबंधित विज्ञान, संशोधन आणि सेवांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी हा एक बहुआयामी आणि परिवर्तनशील उपक्रम ठरेल, अशी अपेक्षा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या घटना आणि हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी नागरिक आणि वापरकर्त्यांसह सर्व संबंधितांना अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करण्यात मदत करेल. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम दीर्घकाळात समुदाय, क्षेत्रे आणि परिसंस्थांमध्ये क्षमता आणि लवचिकता वाढवण्यात मदत करेल.
मिशन मौसमचा एक भाग म्हणून, भारत वातावरणीय विज्ञान, विशेषत: हवामान निरीक्षण, मॉडेलिंग, अंदाज आणि व्यवस्थापन यातील संशोधन आणि विकास तसेच क्षमता यात वेगाने विस्तार करेल. प्रगत निरीक्षण प्रणाली, उच्च-कार्यक्षमतेचे संगणन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून, मिशन मौसम अधिक अचूकतेसह हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी एक नवीन मापदंड स्थापित करेल.
मॉन्सूनचा अंदाज, हवेच्या गुणवत्तेसंबंधी इशारा, अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या घटना आणि चक्रीवादळे, धुके, गारपीट आणि अतिवृष्टीच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना, क्षमता निर्मिती आणि जनजागृती यांसह वेळ आणि स्थान याबाबत अत्यंत अचूक आणि वेळेवर हवामान बदलाची माहिती पुरवण्यासाठी निरीक्षणात सुधारणा करणे यावर या मोहिमेचा भर असेल. मिशन मौसमच्या महत्त्वपूर्ण घटकांमध्ये प्रगत सेन्सर्स आणि उच्च-कार्यक्षमतेच्या सुपर कॉम्प्युटरसह अत्याधुनिक रडार आणि उपग्रह प्रणाली, सुधारित पृथ्वी प्रणाली मॉडेल्सचा विकास आणि वास्तविक-वेळेत डेटा प्रसारासाठी जीआयएस -आधारित स्वयंचलित निर्णय समर्थन प्रणाली यांचा समावेश असेल.
अंमलबजावणीसाठी सहकार्य
भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि राष्ट्रीय मध्यम-अवधी हवामान अंदाज केंद्र या भूविज्ञान मंत्रालयाच्या तीन संस्था प्रामुख्याने मिशन मौसमची अंमलबजावणी करणार असून हवामान तसेच हवामान शास्त्र व सेवा याबाबतीत भारताला पुढे नेण्यात या संस्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, अकादमी आणि उद्योग यांच्या सहकार्यासह भूविज्ञान मंत्रालयाच्या इतर संस्थांद्वारे (भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय महासागर संशोधन संस्था) सहकार्य केले जाणार आहे.
अनेक क्षेत्रांना होणार लाभ
मिशन मौसमचा थेट लाभ कृषी, आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण, विमान वाहतूक, जलसंपदा, ऊर्जा, पर्यटन, नौवहन, वाहतूक, ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रांना होणार आहे. शहर नियोजन, रस्ते आणि रेल्वे वाहतूक, ऑफशोअर ऑपरेशन्स आणि पर्यावरण निरीक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये माहितीपूर्ण निर्णयक्षमतेत वाढ होण्यास यामुळे मदत होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.