Akola News : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील युवा शेतकरी प्रताप गुलाबराव मारोडे यांची तैवान येथे ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात होत असलेल्या जागतिक सेंद्रिय परिषदेसाठी निवड झाली आहे.
प्रताप आपल्या वडिलोपार्जित ४० एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती करतात. यामध्ये कुटुंबासाठी व विक्रीसाठी एकूण ३० प्रकारची पिके घेतली जातात. सेंद्रिय शेती करताना विविध प्रकारचे संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर ते आपल्या शेतात करीत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून त्यांनी केळी हे पीक संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले आहे. केळी पिकासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत आणि काढणीपश्चात सुद्धा सेंद्रिय पद्धती विकसित केली आहे.
यामध्ये हिरवळीचे खत, गांडूळ खत, विविध प्रकारचे जिवाणूचा वापर आणि नैसर्गिक पद्धतीने केळी पिकवणे या गोष्टींचा उपयोग त्यांनी केला आहे. त्यांनी विकसित केलेल्या या पद्धतीने रासायनिक शेतीमध्ये मिळते तेवढेच किंवा त्यापेक्षा सुद्धा अधिक उत्पादन घेतले आहे. या विषयावरच त्यांनी लिहलेल्या संशोधनाची दखल तैवान सरकारने व तेथील नांहुआ विद्यापीठाने घेतली.
या विषयावर लिहिलेल्या संशोधनाची निवड ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान नांहुआ विद्यापीठा (तैवान) त होणाऱ्या २१ व्या जागतिक सेंद्रिय शेती परिषदेसाठी केली आहे. यात प्रताप मारोडे हे केळी विषयावर त्यांनी केलेल्या अभ्यासाची व संशोधनाची मांडणी करणार आहेत. त्यासोबतच तिथे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेती अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली आहे.
आयफोम या संस्थेद्वारा सेंद्रिय शेतीमध्ये अत्यंत मानाची समजली जाणारी ही परिषद १९७१ मध्ये सुरू झाली होती. या परिषदेमध्ये जगभरातील १०० देशातील शेतकरी, संशोधक व सेंद्रिय शेती विषयातील अभ्यासक सहभागी होणार आहेत. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मारोडेंना इनोफो या संस्थेद्वारा १५०० अमेरिकन डॉलरचे अर्थ साहाय्य सुद्धा दिले जाणार आहे.
कृषी पदवीधर आहे प्रताप
प्रताप मारोडे यांचे बीएससी कृषी शिक्षण झाले आहे. त्यानंतर सेंद्रीय शेती पद्धतीमध्ये त्याने झोकून देत काम सुरू केले. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया (OFAI)संघटनेचा सदस्य आहे. पानी फाउंडेशनसाठीही काम केले. सेंद्रिय शेती, पारंपरिक बियाणे आणि जैवविविधतेचे महत्त्व वाढविण्यासाठी देशी बियाणे महोत्सव आणि वन्य भाजी महोत्सवांचे आयोजक म्हणून काम करीत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.