
Water Management : जल व्यवस्थापन हा शिकण्याचा, शिकविण्याचा आणि मिळालेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष अवलंबन करण्याचा विषय आहे, पण प्रत्यक्षात असे घडते का? मानेराजुरी या तासगाव तालुक्यामधील गावात पाच हजार बोअर घेतल्या गेल्या म्हणजे ठिपक्यांची रांगोळीच तयार झाली.
कितीतरी बोअरवेल ५०० ते ८०० फूट खोल गेल्या पण फक्त धुरळ्याशिवाय तेथून काहीच बाहेर आले नाही. हे गाव २००४ पर्यंत प्रतिदिन एकशे पन्नास टँकरवर द्राक्ष उत्पादन घेत होते.
टँकरच्या पाण्यावर द्राक्ष शेतीचा हा पहिलाच प्रयोग असावा. आपले पूर्वज म्हणत, ‘‘अंथरूण पाहून पाय पसरावे.’’ जिथे पावसाची शाश्वती नाही, भूगर्भात पाणी नाही अशा ठिकाणी लोकांनी द्राक्ष, ऊस अशी पिके का घ्यावीत?
आपण प्रत्येक जणच पाणी, पर्यावरण, क्रिकेट, शेती आणि राजकारण यातील तज्ज्ञ समजत असतो, त्यामुळे त्यावर सतत प्रतिक्रिया देत असतो. पु. ल. देशपांडे म्हणत, ‘‘आपण कुठे नोकरी करतो, आपले शिक्षण काय, त्याचा दर्जा काय, याचा आपण सारासार विचार सुद्धा करत नाही.’’
जमिनीस छिद्र पाडले की पाणी वर येणारच, ही आपली समजूत. वास्तविक भूगर्भात जिथे पाणी आहे तेथेच बोअरवेल घेणे इष्ट. त्यातही त्याचा सल्ला त्या क्षेत्रामधील तज्ज्ञाकडून घेतला पाहिजे.
ओढा, नाला, नदी, तलाव, तळी, सरोवर हे पृष्ठभागावरील पाणी आहे. त्यात पावसाचे पडलेले पाणी वाहते. पावसाचे मुरलेल्या पाण्यातील सुमारे ९० टक्के पाणी मातीमधून झिरपत खालच्या खडकापर्यंत जाते.
केवळ १० टक्के पाणी खालच्या पाषाणाच्या लहान सूक्ष्म छिद्रातून खाली जाते. हेच खरे भूजल किंवा जलधर (Aquifer) होय. आणि हेच पाणी मिळविण्यासाठी आपण बोअरवेल घेत असतो.
बोअरवेल म्हणजे एखाद्या स्ट्रॉने पाणी ओढून घेण्यासारखेच. अशा प्रकारे आपण पाणी चक्क शोषून घेत खालचा जलधर रिकामा करत आहोत. त्या भरण्यासाठी आपण काही प्रयत्न करताना दिसत नाही.
वास्तविक प्रत्येक गावाने आपले आपल्या शिवारामध्येच मिळवले पाहिजे. पण आपण टॅंकरने पाणी आणतो, म्हणजे काय करतो दूर एखाद्या गावामधील विहिरीमधून पाणी आणतो. विहीर खोदताना माती, मुरूम बाहेर काढतात. त्यानंतर खोलीकरण सुरू असताना पाषाण लागतो आणि तिथेच अचानक एखादा झरा मिळतो.
हे मुरलेल्या पाण्यापैकी ९० टक्क्यांतील पाणी. मे महिन्यामध्ये अगदी प्यायचे पाणीही जेव्हा अशा प्रकारे दुसऱ्या गावातून आणावे लागत असल्याची स्थिती आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील धरणामध्ये जास्त पाणी असूनही मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी टँकरची संख्या वाढलेली आहे, हे आश्चर्य आहे.
वर्षातील ३५५ दिवस टॅंकर पाण्याची वाहतूक करून जनतेची तहान भागवत आहेत. त्याच्या फार आकडेवाडीमध्ये न शिरताही तेवढ्या पैशात त्या गावात शाश्वत पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही का?
एखादा आदिवासी पाडा किंवा गावात पडणारा पाऊस अडवून भूगर्भात मुरविण्यासाठी प्रयत्न केल्यास ही समस्या निश्चित कमी होईल. असे अनेक यशस्वी प्रयोग कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी निधीतून ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत.
‘इच्छा तेथे मार्ग’ असतोच पण सर्व गोष्टी ‘देरे हरी खाटल्यावरी’ असे कसे चालणार? प्रत्येक गावकऱ्याने थोडा तरी पुढाकार घेतला पाहिजेच. खरेतर पाण्याचे टँकर गावात येणे ही गावामधील लोकांची ‘जल असुरक्षितता’ आहे.
१९७२ आणि पुढेही सर्व दुष्काळात मराठवाड्यासह राज्यातील हजारो गावे टँकरवर अवलंबून होती. त्याचा वाट पाहत बसलेले बायाबापडे हे केविलवाणे वाटते. सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण होते. शासन टँकर गावात
पाठवते, ती तात्पुरती मलमपट्टी समजली पाहिजे. पण आमच्या गावात आठवडा, दोन आठवड्यांनी नळाला पाणी येते, टँकरने किंवा रेल्वेने पाणी येते, हे लांच्छनास्पदच मानले पाहिजे.
पाणी पुरवणे ही सरकारची जबाबदारी मानली जाते, त्याऐवजी पाणी संवर्धनासाठी, जपण्यासाठी, पुनर्भरणासाठी मदत करणे ही खरी शासनाची जबाबदारी मानली पाहिजे.
तातडीच्या परिस्थितीत टँकरची तात्पुरती मलमपट्टी किंवा सलाईन ठिक, पण सलाईनवर जगतो असे कुणी म्हणत असेल, ते कदापि योग्य नाही. उलट ज्या भागात कायमस्वरूपी दुष्काळ असतो, पाऊस कमी असतो.
तेथे भूगर्भात जास्तीत जास्त पाणी साठवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. अशा सूर्याची उष्णता आणि कोरड्या वातावरणामुळे बाष्पीभवनही जास्त वेगाने होते. तिथे शेततळ्यामध्ये पाणी साठवणे कितपत योग्य असा प्रश्नही आपल्याला पडला पाहिजे.
कोकणासारख्या भागात भरपूर पाऊस पडत असला तरी डोंगर उतारावरून वाहून जातो. अशा ठिकाणी पाण्याचा वेग कमी करून वेगवेगळ्या मार्गाने ते भूगर्भात जिरवणे महत्त्वाचे ठरते.
त्यासाठी डोंगर सतत हिरवे असणे, वृक्ष लागवड, उतारावर चर खोदणे महत्त्वाचे ठरते. पूर्वी कोकणात डोंगर उतारावर सेंद्रिय भात शेती होई. ती खाचरे आता पडीक पडली आहेत. नद्यांना अडवणारे, पाणी जिरवणाऱ्या पारंपारिक पद्धती राहिल्या नाहीत.
मराठवाड्यासारख्या भागात पडीक राहिल्याने कडक झालेल्या जमिनी नांगरटीने थोड्या तरी भुसभुशीत केल्या तरी त्यात पाणी साठेल, मुरेल. अनेक ठिकाणी प्रतिवर्षी मध्यम पाऊस तरी नक्कीच पडतो.
त्यात उत्तम नियोजन केले तरी पारंपरिक पिके नक्कीच घेऊ शकतो. मात्र सर्वांनीच नगदी आणि अधिक पाण्याची ऊस, सोयाबीन, कापूस यासारखी पिके घ्यायचा हव्यास धरला पाणी व्यवस्थापनाचे गणित बिघडून जाते.
राजस्थानमध्ये पाऊस कमी पडतो म्हणून तेथील जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. आपल्याकडे पाऊस जास्त असला तरी ही क्षमता कमी आहे. शेवटी हे निसर्गाचे स्वतःचे गणित आहे.
चेक डॅम योग्य प्रकारे कार्यान्वित करावेत
पावसाचे पाणी अडविण्याचे जे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये एक मुख्य म्हणजे ‘चेक डॅम’. हा उपक्रम शासनाबरोबरच सामाजिक दायित्वामधूनही राबविला जातो. ‘चेक डॅम’ पहिल्या पावसामध्येच ओसंडून वाहू लागला ही यशोगाथा ठरत नाही.
पहिल्या पावसाचे पाणी चेक डॅमच्याही आधी जमिनीमध्ये मुरणे आवश्यक असते आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ‘चेक डॅम’ हजारो बांधले पण पाणी किती अडले हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो.
ते बांधताना त्याच्या दोन्हीही बाजूंचे पंख (wings) इंग्रजी ‘V’ सारखे असले, तर डाव्या आणि उजव्या बाजूस भरपूर पाणी जमिनीमध्ये मुरते. यामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर गाळ, माती खाली वाहून येऊ नये यासाठी वरील बाजूस गॅबियन बंधारा असला पाहिजे.
शेततळे कशासाठी हवे?
शेततळे हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. ७/१२ चा उतारा दिला आणि कमीत कमी ५ एकर जमीन असेल, तर त्यास शेततळे मिळते, हे खरेच पाणी व्यवस्थापनाचे चांगले प्रारूप ठरू शकेल काय? शेततळे कशासाठी, कोणत्या पिकासाठी, फळे, पालेभाज्यासाठी त्याची खोली, त्यात किती पाणी साठवणार, ते रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी पुरणार का, अशा अनेक प्रश्नांचा विचार व्हावयास हवा.
शेततळे कधीही जमिनीच्या वर असता कामा नये. पाणी जमिनीमध्ये अधिक साठले पाहिजे. शेततळे हा शासनाने शासनासाठी चालवलेला उपक्रम न ठरता शेतकऱ्यांनी पर्जन्य जलाचे उत्कृष्ट व्यवस्थापन याचा उत्कृष्ट धडा ठरला पाहिजे.
जलसुरक्षा ः
पावसाळ्यात डोंगर उतारावरून ओढे नाले वाहू लागतात. हे पावसाचे पाणी आपल्यासाठी महत्त्वाचा स्रोत असला तरी प्रत्येक ओढा, नाला ही निसर्गाची स्वतंत्र परिसंस्था आहे, याची आपण जाणीव ठेवायला हवी. ते वाहते ठेवण्यासाठी गाळ काढण्यासह आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजे.
यांत्रिकीकरणामधून खोलीकरण आणि रुंदीकरण करणे नैसर्गिक परिसंस्थेस जास्त संवेदनशील आहे. पाणी व्यवस्थापनामधील जलसुरक्षा विषयक शिक्षण शालेय जीवनापासूनच दिले पाहिजे. बालभारतीने ९ व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी जल सुरक्षा हा विषय आवश्यक केला आहे.
हा अतिशय स्तुत्य उपक्रम असला, तरी त्यातून विद्यार्थी केवळ उत्तरपत्रिकेतील गुणांपुरतेच शिकत नाहीत, हेही पाहिले पाहिजे. आम्ही लहाणपणी मोठ्या भावांची जुनी पुस्तके जपून वापरत असू, तीच पुढील भावंडाना दिली जात. आता शाळेत निःशुल्क मिळणाऱ्या पुस्तकांची किंमत मुलांना कळत नाही.
आपण म्हणतो, ‘‘मी पाण्यासारखा पैसा खर्च केला.’’ याचा अर्थ पाण्याला काहीच किंमत नाही, पैसा मातीत गेला म्हणजे मातीला किंमत नाही. हे संस्कार आपण उद्याच्या पिढीवर करणार आहोत का?
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.