
Nashik News: त्र्यंबकेश्वरसह अंजनेरीच्या दुर्गम जंगलांतील वनस्पतींचे १,०३८ नमुने संकलित करण्यात आले आहेत. या नमुन्यांची न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डनच्या डेटाबेसमध्ये नोंद झाली आहे. वनस्पतिशास्त्र विषयात संशोधन कार्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ‘हर्बेरियम’कोडमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाने मान मिळविला आहे.
नाशिक शहराच्या पश्चिम भागातील अंजनेरी जंगल परिसरात ‘सेरोपेजिया अंजनेरिका’(लहान खरपुडी) सारख्या ११४ दुर्मीळ वनस्पती प्रामुख्याने अंजनेरीच्या जंगलात सापडते. जिचा आयुर्वेदातही महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो. अशा दुर्मीळ वनस्पतींचे संकलन त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. शरद कांबळे व विद्यार्थ्यांनी केले आहे. आतापर्यंत १,००० हून अधिक वनस्पती शोधून संकलित केल्या आहे. त्यातील २०० वनस्पती दुर्मीळ प्रकारात मोडतात. अशा १,०३८ वनस्पतींचा संग्रह आता ‘एम.व्ही.पी.एस’ नावाने ‘हेर्बेरीअम’कोड जगभरात ओळखला जाईल.
न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डनच्या ‘विल्यम आणि लिंडा स्टिअर हर्बेरियम’मध्ये सात दशलक्षांहून अधिक जतन केलेल्या वनस्पती नमुन्यांचा संग्रह आहे. अशा दुर्मीळ आणि महत्त्वाच्या वनस्पती शास्त्रीय अभ्यासासाठी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. वनस्पतीच्या काही भागांचा संग्रह हा ‘हर्बेरियम’म्हणून ओळखला जातो. त्याला विशिष्ट असा कूटअंक (कोड) दिलेला असतो. या कोडच्या आधारे जगभरातून कोठूनही विशिष्ट नमुन्यांबद्दल माहिती मिळवली जाऊ शकते.
या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक मंडळ, महाविद्यालय विकास समिती व स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, ॲड. कैलास पाटील, त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी अभिनंदन केले. डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव उपस्थित होते.
कोड मिळविणारे त्र्यंबकेश्वर महाविद्यालय ठरले पहिले
‘हेर्बेरीअम’कोड मिळवणारे त्र्यंबकेश्वर महाविद्यालय हे नाशिकमधील पहिली संस्था ठरले आहे. सगळ्यात मोठे हेर्बेरीअम हे लंडनमध्ये आहे. ज्या संस्थेकडे ५०० पेक्षा जास्त वनस्पतींचे नमुने आहेत व या वनस्पतींची अद्ययावत माहिती उपलब्ध आहे, त्यानांच हा कोड मिळविता येतो. महाराष्ट्रात अगदी मोजक्या संस्थांकडे हा कोड आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.