
नीरज हातेकर
आजघडीला दोन अर्थतज्ज्ञांची प्रकर्षाने आठवण येते आहे. Thornstein Veblen हे अमेरिकन, तर V.A. Chayanov हे रशियन. पहिले १९ व्या शतकातले, तर दुसरे स्टॅलिनच्या काळात खोट्या आरोपांखाली गोळी घालून मारलेले. Veblen यांचे गाजलेले पुस्तक The theory of the leisure class. यात आजच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग म्हणजे उपभोग खर्चाचा समाजशास्त्रीय पाया तपासून पाहणारे हे पुस्तक आहे.
भांडवली व्यवस्थेत व्यक्तीच्या वस्तूंवरील मालकीतून व्यक्तीचा सामाजिक स्तर निश्चित होतो. १९९१ नंतर वाढीस लागलेल्या ऊर्ध्वगामी समाजात विविध समूह समाजातील आपले स्थान उंचाविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात तुमच्याकडे कोणत्या वस्तू आहेत हे तुमच्या सामाजिक मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. मी बंगळूरमध्ये एका अत्यंत उच्चंभ्रू सोसायटीत राहतो. नुकतीच एक घटना घडली.
सोसायटीत राहणाऱ्या एका लहान मुलाला त्याच्या बरोबरीच्या मित्रांनी त्रास दिला. कारण? या मुलाचे राहते घर भाड्याचे होते, मालकीचे नव्हते. भरीस भर म्हणून त्याचा वडिलांनी सेकंड हॅण्ड गाडी विकत घेतली. या मुलाच्या कुटुंबाचा सामाजिक दर्जा आपल्या बरोबरीचा नाही आणि म्हणून तो आपल्यातला नाही हे अगदी लहान मुलांना सुद्धा जाणवले. हे सगळीकडेच होते. ज्यांची परिस्थिती फार चांगली नाहीं त्यांना तर फार त्रास होतो.
मुंबई विद्यापीठात हंगामी सुरक्षा रक्षक आहेत. त्यांना हातात पगार येतो ११,५०० रुपये. (हल्ली कोर्टाच्या आदेशाने थोडा जास्त येतो.) पण बहुतेकांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहेत. शिकवण्या असतात. खर्चाची तोंडमिळवणी होत नाही.
मग तीन तीन शिफ्ट करायच्या, कुर्ला-सांताक्रूझहून चालत येऊन बस भाडे वाचवायचे, सुटीच्या दिवशी ड्रायव्हरचे काम करायचे, अशी त्यांची कसरत सुरू असते. इथे Chayanov हे अर्थतज्ज्ञ महत्त्वाचे ठरतात.
Theory of the peasant economy हे त्यांचे पुस्तक. लहान शेतकरी कुटुंबांना स्वतःचे शोषण केल्याशिवाय जगणे परवडत नाही, ही मांडणी त्यांनी केली. थोडक्यात, प्रचंड श्रम करावे लागतात, ज्यांचा नीट हिशेब लावला तर धंदा आतबट्ट्याचा ठरतो. याचा हिशेब न लावताच जगत राहणे हाच पर्याय उरतो.
मुंबई विद्यापीठातील सुरक्षारक्षक सुद्धा हेच करताहेत. शेतकरी हेच करताहेत. असंघटित क्षेत्रातील कामगार, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत तर हे विशेष लागू पडते. आपल्या भोवतालच्या उच्चभ्रू समाजाने स्थापित केलेल्या जीवनस्तराच्या शक्य तितक्या जवळ कसे जाता येईल ही चढाओढ असते. मग खर्च वाढतो आणि त्यासाठी करावी लागणारी मेहनतही.
हा मुद्दा दारिद्र्याच्या चर्चेसाठी खूप महत्त्वाचा आहे. एक तर आपल्याकडे उपभोग खर्चाचे मापन करतात; पण तो खर्च करण्याची क्षमता किती कष्टाने आणि कोणत्या परिस्थितीत, कशा पद्धतीने येते याचे मापन होत नाही. दुसरे म्हणजे वरच्या गटांचा जीवनस्तर उंचावला तर गरीब लोकसुद्धा आपला खर्च उंचावतात; कारणं सामाजिक दर्जा सापेक्ष असतो.
अर्थात, श्रीमंतांचे उत्पन्न आणि गरिबांचे उत्पन्न यात खूपच फरक असतो. त्यामुळे एकीकडे विषमता वाढते तर दुसरीकडे गरिबांचा उपभोग खर्च वाढल्यामुळे गरिबी कमी झाली आहे आहे असे चित्र निर्माण होते. म्हणून गरिबीचा अभ्यास करताना फक्त गरिबांचा उपभोग खर्च वाढला आहे का हे तपासणे योग्य नाही. तो खर्च कोणत्या संदर्भ चौकटीत (context) वाढतोय हे तपासणे आवश्यक आहे. म्हणून उपभोगखर्चाचे समाजशास्त्र खूप आवश्यक आहे.
(लेखक प्रख्यात अर्थतज्ज्ञ असून, बंगळूरच्या अझीम प्रेमजी विद्यापीठात अध्यापन करतात.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.