

इंद्रजित भालेराव
Devotional Biography: उन्हाचा कहार, तापलेला डोंगर, भर दुपारची वेळ, सूर्य आग ओकतो आहे, सगळीकडून पोळणाऱ्या झळाया वहात आहेत, अशा वातावरणात जिंतूर परिसरातील मैनापुरीच्या डोंगरावर परवा २५ मार्च २०२५ रोजी नथू महाराज केहाळकर यांच्या 'प्रेमसिंधु' या चरित्राचा प्रकाशन समारंभ झाला. जमा झालेली सगळी बाया-माणसं या डोंगरमाळातलीच. त्यांना ऊन काय आणि तहान काय ! रापलेली ही माणसं उन्हाच्या झळाया झेलत मस्त डोंगरमाळावर बसलेली. आम्ही शहरातून गेलेली माणसं मात्र लहा लहा करत घामेजलेली.
त्या डोंगरमाळातल्या माणसांना ऊन म्हणजे काय ते माहित आहे पण प्रकाशन समारंभ म्हणजे काय ते मात्र माहित नाही. पण नथू महाराजांच्या प्रेमापोटी ही सगळी माणसं जमलेली. यांच्यासमोर बोलायचं म्हणजे एक परीक्षाच. यांना पोथी पुराणातून, किर्तन भजनातून किंवा लोकगीतातून काही समजून सांगितलं तरच कळणार. समीक्षेच्या भाषेत पुस्तकावर बोलू लागलं तर ह्या माणसांना काहीच कळणार नाही, याची मला जाणीव आहे. अर्थात काही कळो न कळो पण महाराजांवरच्या श्रद्धेपोटी ही माणसं स्थिर बसून राहतील, उठणार नाहीत याची मला खात्री होती.
नथू महाराज केहाळकर म्हणजे याच डोंगरमाळातून उगवलेलं एक तपस्वी व्यक्तिमत्व. याच परिसरात जन्मले, याच परिसरात वाढले, याच परिसरात साधना केली, याच परिसरात तपश्चर्या केली, याच परिसरात आयुष्यभर कीर्तन करत फिरले, याच परिसरातल्या माणसांना आयुष्यभर केवळ आणि केवळ प्रेम वाटत फिरले. या परिसरातल्या माणसांनीही त्यांना अलोट प्रेम दिलं. म्हणून जनमानसांनीच त्यांना दिलेली पदवी प्रेमसिंधू , प्रेमाचा सागर. त्या प्रेमसागरात न्हाऊन निघालेली ही माणसं. इथं आता त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभासाठी जमलेली.
प्रेमसिंधूचे लेखक म्हणजे ह. भ. प. नारायण महाराज हेही याच परिसरातले. सांप्रदायिक वारकरी आणि कीर्तनकार. जवळच्याच पांगरी गावात आयुष्य घालवलेले, तिथल्या बाळगोपाळावर संस्कार केलेले, तिथल्या तरुणांना वळण लावलेले, साधेसुधे गृहस्थ. त्यांना उत्स्फूर्तपणे वाटलं की नथू महाराज केहाळकरांचं जीवनचित्रण आपण केलं पाहिजे. पण लेखनाचा अनुभव नाही. उत्कट उर्मीने त्यांच्या हातात लेखणी दिली आणि महाराज लिहीत गेले. ते अत्यंत प्रासादिक उमटत गेलं. त्यातून नथु महाराज स्वयंभूपणे प्रगटत गेले. लिहून झालं खरं पण याचं पुस्तक कसं छापावं ? याचं पुढे काय करावं ? ते माहीत नाही. माझे विद्यार्थी प्रा. बाळू बुधवंत, प्रा. प्रकाश घुगे, प्रा. दामोदर बुधवंत यांनी महाराजांना विश्वास दिला, पुढचं सगळं आम्ही करतो. प्रा. डाॅ. संगीता घुगे यांच्या सहाय्याने त्यांनी ही नौका पार पाडली. सरदार जाधव या मित्राने मुखपृष्ठ सजवले. ग्रंथ सिद्ध झाला. निका झाला.
या माझ्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाने आणि महाराजांच्या माझ्यावरच्या विश्वासाने मी प्रकाशन समारंभाला गेलो. मीच यावं असा या सगळ्यांचा आग्रह. माझ्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट होती. अध्यक्ष म्हणून साक्षात नथू महाराजांच्या परमगुरु घराण्यातील तुकाराम बुवा गरुड उपस्थित होते. ज्यांच्या आर्थिक व्यवहारालाही अध्यात्माचा पाया आहे असे सुंदरलाल सावजी बँकेचे सर्वेसर्वा मुकुंद सावजी कळमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असा हा समसमा संयोग होता. समोर मात्र बहुतेक सगळी डोंगरमाळातली माणसं आणि थोडीशी जिंतूरहून आलेली काही प्रतिष्ठित व्यापारी मंडळी आणि महाविद्यालयीन प्राध्यापक मंडळी.
भक्तांनी ढोंगी साधूच्या नादी लागू नये म्हणून आपण हे चरित्र लिहीत आहोत, अशी नारायण महाराजांची भूमिका, त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत नोंदवलेली आहे. पोलिस आणि कोर्टात धर्माचे धिंडवडे काढणाऱ्यांसाठी पथदर्शक म्हणून त्यांनी हे एका आदर्श वारकऱ्याचे चरित्र लिहिलेले आहे. तसे तर या ग्रंथाचे लेखक नारायण महाराज हेच साधुत्वाचा एक आदर्श आहेत. त्यांनी या ग्रंथलेखनासाठी अपार मेहनत घेतलेली आहे. अशीच मेहनत भगवान मिसाळ यांनी भगवानबाबांचं चरित्र लिहिण्यासाठी घेतलेली होती. नारायण महाराजांना जणू ईश्वराने हेच काम करण्यासाठी जन्माला घातले असावे. नारायण महाराज भाग्यवान की त्यांना नथू महाराजांसारखा चरित्रनायक मिळाला आणि नथु महाराज भाग्यवान की त्यांना नारायण महाराजांसारखा चरित्रलेखक मिळाला. नाही तर याच परिसरात होऊन गेलेल्या मोतीराम महाराज, मारोतराव महाराज यांच्यावर कुणी कुठं काय लिहिलं ?
प्रेमसिंधू हे चरित्र वाचताना मला सतत साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या कवितेची आठवण होत होती. त्या कवितेतला शब्द न शब्द महाराज साक्षात जगले. सगळ्यांवर अखंड प्रेम करत राहिले. धुंद होऊन ईश्वराची भक्ती करत राहिले. नारायण महाराजांनी या ग्रंथात सांगितलेल्या काही आठवणीवरून महाराज नेहमीच सद्गदीत व्हायचे, कीर्तनात बेधुंद व्हायचे, ते पडतील म्हणून त्यांना सावरण्यासाठी भक्त भोवती कडे घालून उभे राहायचे, इतके ते ईश्वरलीन व्हायचे. म्हणजे एका अर्थाने मधुराभक्तीसारखंच त्यांचं आचरण होतं. सुफींसारखेच ते पूर्णपणे ईश्वराशी एकरूप व्हायचे. अशा अवस्थेत त्यांना ईश्वराचा साक्षात्कार होत नसेल असे कशावरून ? इतक्या उत्कटपणे जर आपण ईश्वराला बोलवत असू तर तो नक्कीच भेटायला येत असणार ! नथूराम महाराज जेवढे उत्कट तेवढेच त्यांचे चरित्रलेखक नारायण महाराज हेही उत्कट. त्यांनी उत्कट होऊन हे सगळं चरित्र लिहिल्यामुळे ते अत्यंत वाचनीय झालेलं आहे.
महाराजांनी गावोगाव फिरून, नथू महाराज केहाळकर यांच्या आठवणी गोळा करून हे चरित्र सिद्ध केलेलं आहे. पण मला महाराजांना सांगावसं वाटतं की त्यांनी काही बायकांना भेटून हे विचारायला पाहिजे होतं की, त्या नथू महाराजांवर जात्यावर काही ओव्या म्हणतात काय ? आता जातं, दळण आणि त्यावर ओव्या म्हणणाऱ्या बाया राहिल्या नाहीत. पण नथू महाराजांचा काळ असा होता की त्या काळात हे सगळं काही होतं. भगवान बाबा यांच्यावर लिहिलेल्या ओव्या माझ्या वाचनात होत्या. सत्तरऐंशी वर्षांपूर्वी ना. गो. नांदापूरकर यांनी मराठवाड्यातून ज्या जात्यावरच्या ओव्या गोळा केल्या आणि त्यातून मराठी माती, मराठीचे माहेर, मराठीचा मोहर अशी जी ओव्यांची संकलने सिद्ध केली
त्यात भगवान बाबांवरच्या ओव्या वाचायला मिळतात. भगवान बाबांचा वेश, भगवान बाबांचं दिसणं, भगवान बाबांची डमणी, डमणीचे बैल, भगवान बाबाच्या गावातल्या आगमनाचा सोहळा, कीर्तनाचा सोहळा, घरोघर भेटी देण्याचा सोहळा या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्या ओव्यांमधून केलेलं दिसतं. कदाचित जुन्या काळातल्या बायांनी नथू महाराजांच्याही व्यक्तित्त्वाचं असं वर्णन जात्यावरच्या ओव्यांमध्ये करून ठेवलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा काही ओव्या सापडल्या तर, नथू महाराजांच्या चरित्राला एक वेगळंच परिमाण लाभणार आहे.
प्रकाशन समारंभाच्या दिवशी या ग्रंथाच्या पाठीवर मी लिहिलेला मजकूर आणि ग्रंथाचे मुखपृष्ठ माझ्या फेसबुकपेजवर मी टाकलं होतं. त्या दिवशी अरुण चव्हाळसारख्या माझ्या विद्यार्थी मित्राने आणि आणखीही काही जणांनी महाराजांना लहानपणी जवळून पाहिलेल्या आणि त्यांच्या सहवासातला ओलावा अनुभवलेल्या लोकांच्या आठवणी गोळा करून आणखीही काही परिमाण या ग्रंथाला देता येऊ शकेल. कारण महाराजांच्या आठवणी सांगणारे लोक अजून शिल्लक आहेत. महाराजांना जाऊन बारा वर्षे झाली आहेत. त्यामुळे महत्त्वाच्याच व्यक्तींना भेटून माहिती गोळा करण्याऐवजी जाहीर आवाहन करून अशा आठवणी गोळा केल्या तर लोक उत्कटपणे लिहीतील आणि त्या आठवणी वाचायलाही मजा येईल. त्यातल्या निवडक आठवणींचं पुढेमागे आणखी एखादं संकलनही करता येईल.
मी जात्यावरच्या ओव्यांचा विषय काढला आणि कुणीतरी मी ओव्या म्हणाव्यात अशी खालून आरोळी ठोकली. सगळीकडूनच तिला साथ मिळाली. शेवटी विठ्ठल आणि जनाबाईंच्या ओव्या म्हणत म्हणत या मायमाऊल्यांना साद घालत मी माझ्या भाषणाचा समारोप केला. महाराष्ट्रभर अनेक प्रकाशन समारंभांना मी उपस्थित असतो. समोरचा श्रोत्रूवर्ग प्रकाशन समारंभ म्हणजे काय ? हे माहीत असलेला असतो. त्यांच्यासमोर बोलताना बोलणं सहज सोपं जातं. पण इथं बोलणं अवघड होतं. म्हणजे बोलणं अवघड नव्हतं पण या लोकांना पटेल, कळेल अशा भाषेत या ग्रंथावर बोलणं अवघड होतं. पण मला अशा मायमाऊल्यांमध्ये रमून जाण्याची कला उपजत अवगत आहे. त्यामुळे मला हा प्रकाशन समारंभ विलक्षण आनंद देऊन गेला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.