
Pune News : राज्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झालेली असली, तरी बॅंकांना मात्र पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण कर्जवितरण ६६ टक्क्यांपर्यंत झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५१ हजार कोटींपेक्षा जास्त कर्जवितरणाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले होते. त्यापैकी जवळपास २९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज खरीप पिकांकरिता द्यावे, असेही बॅंकांना सांगण्यात आले होते. त्यासाठी अंदाजे ४९ लाख खातेदार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे निश्चित केले गेले होते. प्रत्यक्षात खरिपाचा पेरा संपेपर्यंत केवळ ३४ हजार कोटी रुपयांच्या आसपास कर्जवितरण करण्यात बॅंकांना यश आले आहे. त्यामुळे कर्जवितरणात पिछाडीवर असलेल्या बॅंकांकडे उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने पाठपुरावा चालूच ठेवला आहे.
“पीककर्ज वितरणात राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी नेहमीसारखी आघाडी ठेवली आहे. जिल्हा बॅंकांनी १६ हजार १३४ कोटी रुपयांचे वितरण केले आहे. ते उद्दिष्टाच्या ८५ टक्क्यांपर्यंत आहे. राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांना मिळून यंदा ५४ लाख शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्ज द्यायचे होते.
प्रत्यक्षात पेरण्यांचा कालावधी संपला, तरी ३६ लाख शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले. काही राष्ट्रीयीकृत बॅंकांना उर्वरित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात बॅंकांना अपयश आलेले आहे. तसेच दुर्गम भागातील शेतकऱ्यांना कर्ज न काढताच शेती करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उद्दिष्ट गाठता येत नाही,” असे जिल्हा बॅंकेच्या एका व्यवस्थापकाने स्पष्ट केले.
आतापर्यंतच्या कर्जवितरणात अमरावती विभाग आघाडीवर राहिला आहे. या विभागात आठ लाख शेतकऱ्यांना ७५६ कोटी रुपये कर्जवितरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले होते. उद्दिष्टाच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ५.४० लाख शेतकऱ्यांना ५७६ कोटींचे कर्ज दिले गेले. राज्यात सर्वांत कमी कर्जवितरण नाशिक विभागात झालेला आहे.
नाशिक विभागाची क्षमता असल्यामुळे या विभागात खरीप व रब्बी मिळून १६.३३ लाख शेतकऱ्यांना १७ हजार ९६० कोटी रुपये देण्याचे देण्याचे कागदोपत्री ठरविण्यात आले. प्रत्यक्षात आतापर्यंत खरिपात सात हजार ६९० कोटी रुपयांचे कर्जवितरण करण्यात आलेले आहे.
सहकार विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कर्जवितरण प्रक्रिया वेगाने पुढे नेण्याबाबत बॅंकांकडे राज्य शासनाकडून सतत पाठपुरावा चालू आहे. खरीप हंगामातील कर्जवितरण अजूनही सुरू आहे. काही शेतकरी गरजेनुसार वेगवेगळ्या पिकांसाठी कर्ज घेतात. त्यामुळे एकूण वितरणाची आकडेवारी आर्थिक वर्षाच्या शेवटी आणखी वाढलेली असेल.
विभाग...उद्दिष्ट...प्रत्यक्ष वितरण...टक्केवारी
कोकण...१५०८७८...९७५६०...५४
नाशिक...उपलब्ध नाही...७६९०५१...५८
पुणे...उपलब्ध नाही...८७६६४९...७४
छत्रपती संभाजीनगर...११५३८२८...७३९६१३...६३
अमरावती...७५६६६८...५७६९३७...७६
नागपूर...५०१३७०...३१७१००...६०
(कर्ज वितरणाची स्थिती ३१ जुलैअखेरची आहे.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.