डॉ. प्रेरणा घोरपडे, डॉ. पवन ऐतवार
Dairy Business Management : यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी नोंदणी करणे, हे एक चांगल्या व्यवस्थापनाचा आवश्यक भाग आहे. कोणत्याही प्रकारची लिखित नोंदणी नसल्यास आर्थिक हिशेब करणे अवघड जाते. जनावरांची नोंदणी करण्यासाठी टॅगिंग आवश्यक आहे. दुग्ध व्यवसायात दूध उत्पादन आणि आर्थिक व्यवहाराच्या काही उपयुक्त नोंदणी महत्त्वाच्या आहेत. यावरून दुग्ध उत्पादनातील वाढ, त्यातील नफा आणि तोटा लक्षात घेता येतो. पुढील नियोजनासाठी नोंदणी आवश्यक आहे. पशुपालक नोंदणी वही बाळगत असेल, तर आपला दुग्ध व्यवसाय कसा चालला आहे, याबाबत इतर पशुपालकांसोबत तुलना करू शकतात. आर्थिक व्यवहार, सरकारी कर्ज आणि कर भरणा शोधण्यास योग्य आकडे माहिती असणे महत्त्वाचे आहे.
नोंदणी वही ठेवण्याचे फायदे :
१) जनावरांच्या मागील नोंदणीचे मूल्यांकन करण्यासाठी संदर्भ मिळतो. यामुळे दुधाळ जनावरांची निवड, अनुपयोगी जनावरांना काढून टाकणे सोपे होते.
२) जनावरांची वंशावळ आणि त्यांचा इतिहास तयार करण्यास मदत होते.
३) मागील नोंदीचे मूल्यांकन करून उत्कृष्ट प्रजनन योजना तयार करण्यात मदत होते. यामुळे जवळच्या नात्यातील जनावरांचे प्रजनन टाळणे शक्य होते. प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते. प्रजननासाठी जातिवंत नर, मादी निवडण्यास मदत होते.
४) वळूच्या प्रजनन परीक्षणात मदत होते.
५) लहान वासरांचे शरीर वजन, दुधाळ जानवरांच्या दूध उत्पादनातील चढ-उतार किंवा आजाराची परिस्थिती शोधण्यास मदत होते.
६) जनावरांच्या सामान्य आजारांची कारणे शोधून वेळेवर खबरदारीसाठी लसीकरण, जंतनाशकाचे सूत्रीकरण आणि उपाययोजना करण्यात मदत होते.
७) खरेदी आणि विक्रीसाठी जनावराची योग्य किंमत ठरविण्यास मदत होते.
८) दूध उत्पादन किमतीचा अंदाज करण्यास मदत होते.
९) दुग्धालयात विविध वर्षांतील जनावरांचा तुलनात्मक अभ्यासकरून प्रत्येक वर्षांतील नफा, तोटा तपासणे सोपे जाते.
नोंदणी वह्यांचे प्रकार :
१) पशुधन नोंदणी : जनावरांची संख्या समजण्यास उपयुक्त ठरते. क्रमांक, जन्म तारीख, नराचा क्रमांक, मादीचा क्रमांक, करडे किंवा वासरांचा क्रमांक व त्याचे लिंग, जन्माची तारीख, विक्री/मृत्यूची तारीख.
२) प्रसूती नोंदणी : ही नोंदणी वासराची नोंदणी करते. वासराचा क्रमांक, लिंग, नराचा क्रमांक, मादीचा क्रमांक, जन्माची तारीख, देय तारीख, प्रसूतीची तारीख, जन्माचे वजन, जातीची टिप्पणी इत्यादी.
३) तरुण जनावरांची वाढ नोंदणी: या नोंदणीत विविध वयोगटांतील जनावरांच्या वजनाची नोंद ठेवली जाते.
४) दैनंदिन आहार नोंदणी : प्रतिदिन जनावरांना दिलेल्या अन्य पोषण पद्धतीची नोंदणी.
५) पशू संख्येची आरोग्य नोंदणी : आजारी जनावरांची नोंद, त्यांचा इतिहास, लक्षणे, वैद्यकीय निदान, दिलेला उपचार, पशुवैद्यकाचे नाव इत्यादी.
६) पशू प्रजनन नोंदणी: जनावरांतील प्रजननाविषयी माहिती. जन्म तारीख, प्रजनन तारीख, प्रजनन क्रमांक, गर्भधारणेचे निदान, वासराचा क्रमांक इत्यादी.
७) पशू इतिहास नोंदणी : जनावराचा नंबर, जात, जन्म तारीख, नर आणि मादी क्रमांक, लक्षणांची नोंद, उत्पादनाची नोंद, मृत्यूची तारीख, विलगीकरणाची नोंद इत्यादी
डॉ. प्रेरणा घोरपडे, ९८३३३०४७२९
(पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.