Sahyadri Village: सह्याद्री डोंगर रांगेतील अनेक लहान गावे विकासापासून वंचित आहेत. हे लक्षात घेऊन राजगड तालुक्यातील (जि. पुणे) नऊ गावांच्या शाश्वत विकासासाठी ‘रेन ट्री फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून या गावांनी पाणलोट, शेती, आरोग्य, पूरक उद्योग आणि पर्यावरण संवर्धनामध्ये गती घेतली आहे. .पश्चिम घाटाच्या हिरव्या कुशीत विसावलेला राजगड तालुका म्हणजे जैवविविधतेचा अनमोल ठेवा. या परिसरामध्ये विविध वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांची समृद्ध जैवविविधता आहे. जागतिक निसर्ग संवर्धन संघटनेच्या यादीतील अनेक धोक्याच्या पातळीवर असलेल्या प्रजाती येथे आढळतात. त्यामुळे जैविक, भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या यांचे जतन अत्यंत गरजेचे आहे..गेल्या काही दशकात मानवाने निसर्गात केलेला हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेचा ऱ्हास झाला. त्यामुळे हा भाग गंभीर पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर आहे. यावर उपाय करण्यासाठी लीना दांडेकर यांच्या कुटुंबीयांनी पुण्यामध्ये ‘रेन ट्री फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. २०१८ पासून या संस्थेने राजगड तालुक्यातील लव्ही, आवळी, मेरावणे, साखर, दादवडी, फणशी, चिरमोडी, घावर आणि गुंजवणे या गावांमध्ये शाश्वत विकासासाठी लोकसहभागातून विविध उपक्रमांना सुरुवात केली..गावांतील स्थानिकांच्या सहभागातून दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन, महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि स्थानिकांमध्ये निसर्ग संवर्धनाची जबाबदारी घेण्याची भावना निर्माण करणे, या तीन गोष्टींवर संस्थेने भर दिला..संस्थेने गावांच्यामध्ये जैवविविधता व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास समिती सदस्यांसाठी जागरूकता सत्रे घेतली. यामुळे पर्यावरणाविषयीची जाणीव वाढली, त्यासोबतच स्थानिक पातळीवर नेतृत्व तयार होत आहे. साखर गावातील नसीमा शेख या संस्थात्मक बळकटीकरण, मानसिक आरोग्य आणि लिंग समानता या विषयावर महिलांना मार्गदर्शन करतात..Sustainable Agriculture: शाश्वत शेतीसाठी आधुनिकतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक.बायोगॅस निर्मितीवर भरपूर्वी स्थानिक लोक इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलावर अवलंबून होते. यामुळे जंगलतोड आणि वायुप्रदूषण होत होते, यावर उपाय म्हणून संस्थेने रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या मदतीने ६० बायोडायजेस्टर यंत्रे बसवली आहेत. यामुळे शेण, सेंद्रिय कचऱ्यातून जैविक खत आणि बायोगॅस निर्मिती होते. दररोज १२४ किलो स्वच्छ बायोगॅस तयार होत असल्यामुळे इंधनासाठी लाकूड वापराचे प्रमाण कमी झाले..वर्षभरात ६७९ किलो कार्बन उत्सर्जन घटण्यास मदत झाली. या उपक्रमातून दरवर्षी प्रत्येक कुटुंबाची साधारणपणे १० हजार रुपयांची बचत होत आहे. महिलांचे लाकूडफाटा तोडण्याचे कष्ट वाचले. बायोडायजेस्टरच्या माध्यमातून तयार होणाऱ्या स्लरीचा वापर जमीन सुपीकतेसाठी केला जातो. बायोगॅसचा वापर वाढल्याने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांची होणारी जळजळ कमी झाली. शेण गोळा करणे, बायोगॅस व्यवस्थापन, खतनिर्मितीमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे..जलशुद्धीकरण प्रकल्पराजगड तालुक्यात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो, तरीही उन्हाळ्यात पिण्यासाठी शुद्ध पाण्याची टंचाई जाणवते. यावर शाश्वत उपाययोजना करण्याच्यादृष्टीने संस्थेने रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या माध्यमातून नऊ गावांमध्ये १० ठिकाणी सामूहिक जलशुद्धीकरण यंत्रणा बसवली. एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या मदतीने ही यंत्रणा सौरऊर्जेवर चालवण्यात येते. या उपक्रमातून गावामध्ये २४ तास शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे..या उपक्रमामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची दरवर्षी १२ हजार रुपयांची बचत झाली. याचा फायदा सहाशेहून अधिक कुटुंबांना झाला. ग्रामस्थांना जलशुद्धीकरण प्रकल्पामधून २ ते ५ रुपयामध्ये २० लिटर शुद्ध पाणी मिळते. या उपक्रमामुळे अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण कमी झाले, पाणी विकत घेण्यासाठी होणारा खर्च वाचला. महिलांचा पाणी आणण्याचा वेळ आणि श्रम वाचले. यातून महिलांना घरासाठी वेळ देता येऊ लागला, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्तीचा वेळ मिळू लागला..Sustainable Farming: हवामान बदलासाठी नवी रणनीती हवी.सौर पंप, शेततळ्यांची उभारणीरब्बी आणि उन्हाळी हंगामात शेतीला पाणी मिळावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून १२० अल्पभूधारक शेतकऱ्यांना ३० सौरपंप देण्यात आले. संस्थेने स्थानिकांच्या सक्रिय सहभागातून ७३ शेततळी बांधली आहेत. यामुळे पीक लागवडीला चालना मिळाली. अतिरिक्त उत्पन्न मिळण्याच्या संधी वाढल्या, शेती अधिक फायदेशीर बनली..जैव विविधता नोंदणी उपक्रमपरिसरातील पारंपरिक माहिती आणि स्थानिक प्रजातींबाबतचे पूर्वापार ज्ञान लुप्त होत आहे. यासाठी संस्थेने लोक जैवविविधता नोंदणी उपक्रम सुरू केला. गावकऱ्यांच्या सहभागाने परिसरात आढळणारी झाडे, वनस्पती आणि प्राण्यांबाबत माहितीची नोंद केली जाते. यामुळे गावकऱ्यांना परिसरातील जैवविविधता ओळखता आली तसेच जपण्याची भावना तयार झाली. जैवविविधतेच्या नोंदीसोबत स्थानिकांचे पारंपरिक ज्ञान जपले जात आहे. ही नोंद भविष्यात कायदेशीर हक्क, उपजीविकेच्या संधी आणि पर्यावरण धोरणांमध्ये उपयोगी ठरणार आहे..भातासाठी एसआरआय पद्धतसंस्थेने भातशेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवण्यासाठी एसआरआय पद्धतीचा प्रसार केला आहे. याचा चारशेहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा झाला. यामुळे प्रतिगुंठा भात उत्पादनात वाढ होऊन नफ्यातही वाढ झाली. कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळू लागले आहे..वणवा नियंत्रणासाठी अग्निरोधक पट्टेडोंगरपट्यातील जंगलात अनेक मानवनिर्मित वणवे लागतात. यामुळे जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होतो. ही समस्या थांबविण्यासाठी संस्थेने अग्निरोधक पट्टे तयार करण्यासाठी उपकरणे खरेदी केली. डोंगरी भागात जानेवारी ते मार्च या कालावधीत सहा किमी लांबीचे अग्निरोधक पट्टे तयार केले जातात. यामुळे वणवे पसरत नाहीत. वनविभाग आणि स्थानिकांसोबत घेऊन वणव्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे..लोकसहभागातून पाणलोट क्षेत्र विकासपूर्वी राजगड परिसरात शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई होती. यामुळे पीक उत्पादन कमी यायचे आणि दुसरे पीक घेणेही शक्य नव्हते. ही समस्या ओळखून संस्थेने नऊ गावांमध्ये पाणलोट विकासाचे काम केले. लोकसहभागातून डोंगर उतारावर सलग समतल चर खोदणे, छोटे दगडी बांध आणि गॅबियन बंधारे बांधण्यात आले. या उपायांमुळे जमिनीत पाणी मुरायला मदत झाली. साठवलेल्या पाण्याची एकूण क्षमता ३,६३२ घनमीटर झाली..तसेच १०,८९८ घनमीटर पाण्याची जमिनीमध्ये झिरपण्याची क्षमता निर्माण झाली. यामुळे गावांमध्ये पाणीटंचाई कमी होऊन शेतीला फायदा झाला. गावातील जलस्रोतांचे मजबुतीकरण करताना नद्या, ओढे, पाझर तलावांची दुरुस्ती आणि गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून करण्यात आले. यामुळे जलस्रोतांची साठवण क्षमता वाढली. एकूण एक कोटी लिटर पाणीसाठा तयार झाला. या सगळ्या कामांमुळे गावांमध्ये वर्षभर पाण्याची सोय झाली..महिला गटासाठी विविध उपक्रमसंस्थेने महिलांचे सशक्तीकरण आणि स्त्री-पुरुष समानता यासाठी ३०० हून अधिक जनजागृती तसेच कौशल्य विकास कार्यक्रम घेतले. यामुळे महिलांचा ग्रामपंचायतीतील सहभाग वाढला. ‘मुक्ता’ उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी महिलांशी संवाद साधण्यात येतो. संस्थेने २०२२ मध्ये ‘मनोसारथी’ हे समुपदेशन केंद्र सुरू केले. आतापर्यंत या केंद्रातून ७८ ग्रामस्थांना वैयक्तिक मानसिक आरोग्याबाबत समुपदेशन करण्यात आले..मानसिक समस्या ही लपवून ठेवण्याची गोष्ट नसून, योग्य वेळी मदत घेणे आवश्यक आहे, हे लोकांना समजले. मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला आहे. संस्थेच्या मदतीने १२२ महिलांनी घरामागील मोकळ्या जागेत कुक्कुटपालन सुरू केले आहे. काहींनी भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे. महिला बचतगट आणि ग्रामविकास समित्यांना अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. गटाच्या मदतीने करंज, बहावा, काटेसावर आणि हिरडा यांसारख्या स्थानिक प्रजातींची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे.स्वानंद दामले ८२९०८९१७५९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.