Farmer producer organisation : शेतकरी संघ स्थापन करण्याच्या कामात पंजाब मागे : पंजाबचे कृषिमंत्री गुरुमित सिंग खुदियान

Panjab Agriculture minister : पंजाब राज्याचे कृषीमंत्री गुरुमित सिंग खुदियान व त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुणे कृषी महाविद्यालयास भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली.
गुरुमित सिंग खुदियान
गुरुमित सिंग खुदियानAgrowon

Pune News : ‘‘महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक संघांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यातुलनेत पंजाबमध्ये अजूनही शेतकरी याबाबत मागे असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने अशा संघाची जडणघडण, कार्यपद्धती ही महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विकासामध्ये शेतकरी उत्पादक संघाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे,’’ असे मत पंजाब राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, मत्स्योत्पादन, दुग्धविकास आणि अन्न प्रक्रिया मंत्री गुरमित सिंग खुदियान यांनी व्यक्त केले.

गुरुमित सिंग खुदियान
Himachal Flood : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियानात पावसाचा कहर सुरूच

श्री. गुरुमित सिंग खुदियान व त्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पुणे कृषी महाविद्यालयास भेट देऊन विविध प्रकल्पांची पाहणी केली. महाविद्यालयात चालणाऱ्या विविध शैक्षणिक, अभ्यासेतर उपक्रम, संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण केंद्रे यासंबंधी सादरीकरणाद्वारे माहिती करून देण्यात आली. यामध्ये विशेषतः बी.एस्सी. (कृषी) पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या व आठव्या सत्रात विद्यार्थ्यांनी उद्यमशीलता वाढीस लागावी व रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने चालविण्यात येणाऱ्या अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रमांची माहिती जाणून घेतली. भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र हे पंजाबप्रमाणेच कृषी क्षेत्रात अग्रणी राज्य आहे. या दोन्ही राज्यांमध्ये ऊस, कापूस या पिकांची लागवड प्रामुख्याने होते. या पिकातील प्रमुख समस्या, अडचणी व त्यावरील उपाययोजना या विषयांवर चर्चा करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मासळकर म्हणाले, की महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक संघांमध्ये मालाची प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, मूल्य साखळीचा विकास, निर्मिती व विपणन ही महत्त्वाची बाब आहे. हे सर्व झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे कल्याण होणे अशक्य आहे. तसेच सेंद्रिय मालाचा आग्रह धरण्याऐवजी रासायनिक अवशेषमुक्त कृषी मालाचा आग्रह धरावा. त्यासंदर्भात ग्राहक व उत्पादक या दोन्ही घटकांमध्ये योग्य त्या प्रचार व प्रसाराची तथा जागरूकतेची आवश्यकता आहे. हे करत असतानाच जमीन व पर्यायाने शेतीच्या शाश्‍वतीकरणामध्ये जमिनीचे आरोग्य, माती व पाणी परीक्षणांची आवश्यकता, त्या अनुषंगाने रासायनिक खतांचा गरजेपुरताच वापर, जैविक खते, मित्रकिडी इत्यादींचा वापर सढळपणे करण्याची गरज आहे. या जैविक घटकांच्या उत्पादनासंदर्भात आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षणासाठी ही कृषी महाविद्यालय सदैव मदत करेल असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

या वेळी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्याच्या जलालाबादचे आमदार जगदीप कंभोज, धनवंत सिंग सोधी, पंजाबचे कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. राजकुमार, सुरिंदर सिंग, डॉ. गुरुदेव सिंग, आदेशवीर सिंग, गुरबाज सिंग आणि डॉ. जसविंदर सिंग ब्रार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी या वेळी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com