Crop Management : एकात्मिक कीड व्यवस्थापन ही कीड व्यवस्थापनाची अशी पद्धती आहे की ज्यामध्ये मानव आणि पर्यावरणाला धोका कमी करून किडींचे व्यवस्थापन प्रभावीरीत्या करता येते. रासायनिक कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते, मित्रकीटकांची संख्या कमी होते, नवनवीन किडींचा प्रादुर्भाव होतो, दुय्यम किडी मुख्य किडी होतात. कीटकनाशकांचे अवशेष फळे, भाजीपाला व अन्नधान्य इत्यादींमध्ये तसेच राहतात. त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
व्यवस्थापनाचे घटक
सर्व्हेक्षण
शेतामध्ये कीड आहे का नाही, किती प्रमाणात आहे, किती नुकसान होऊ शकते हे कळण्यासाठी सर्व्हेक्षण आवश्यक आहे.
ओळख
हानिकारक व मित्रकीटकांची योग्यरीत्या ओळख करून घ्यावी. पीकनिहाय किडींचा जीवनक्रम आणि संवेदनशील अवस्थांची माहिती करून घ्यावी. या आधारे कीड लक्षणीय नुकसान करत आहे का नाही हे बघून व्यवस्थापन करावे.
निरीक्षण आणि ओळखीवरून सर्वोत्तम व्यवस्थापन पद्धती योग्य वेळी वापरावी.
मशागतीय पद्धत
किडींचा प्रादुर्भाव, प्रजनन, प्रसार आणि जिवंत राहण्याची क्षमता कमी करता येते. किडीचे प्रत्यक्ष नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक पद्धतीने प्रभावी नियंत्रण करता येते.
पूर्वमशागतीय पद्धत
जमिनीची खोल नांगरट, धसकटे वेचणे, पिकांचे अवशेष जमा करून नष्ट करणे, वखरणी, शेणखताचा वापर यांसारख्या पद्धतींचा समावेश होतो.
खोल नांगरट केल्यानंतर जमिनीत असलेली किडीची सुप्तास्थेतील अंडी, अळी, कोष जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन सूर्याद्वारे उष्णतेने तळपून किंवा पक्षाद्वारे वेचून नष्ट होतात.
खोल नांगरटीमुळे पोत सुधारतो. चांगली वाढ होऊन पीक प्रतिकारक्षम होते. किडीस कमी प्रमाणात बळी पडते.
मागील पिकांची धसकटे, काडीकचरा व इतर अवशेष वेचून स्वच्छ केल्यामुळे किडीची सुप्तावस्था नष्ट होते. त्यामुळे चालू हंगामात किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. वखरणीमुळे कीटकाच्या वेगवेगळ्या अवस्था पृष्ठभागावर येतात. तणाचे नियंत्रण झाल्यामुळे पर्यायी खाद्य वनस्पती नष्ट होतात, पर्यायाने त्यावरील कीटक नष्ट होतात.
शेतामध्ये न कुजलेले शेणखत वापरल्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. चांगले कुजलेले शेणखत वापरल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते, हुमणीचा प्रादुर्भाव कमी होतो.
पूर्वमशागत केल्यामुळे शेतातील मुंग्या, वाळवीची वारुळे नष्ट होतात.
पोषण तत्त्वाच्या अभावामुळे पिकाची प्रतिकारक्षमता कमी होऊन किडींचा प्रादुर्भाव राहतो. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास पिकाची प्रतिकारक्षमता वाढून किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
प्रतिकारक्षम वाणांचा वापर
स्वच्छ, प्रमाणित कीडमुक्त बियाणे, रोपे किंवा बेणे निवडावे.
प्रतिकारक्षम वाणांचा वापर करावा. उदा. पानांवर जास्त लव असलेले वाण लागवडीसाठी वापरल्यास रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
शुद्ध बियाणे, कंद, बेणे, रोपे यांची लागवड केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
लागवडीची वेळ आणि पद्धती
लागवडीची वेळ महत्त्वाची आहे. उदा. करडईची पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यादरम्यान केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो.
क्षेत्रीय पद्धतीने लागवड म्हणजेच आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी कमीत कमी कालावधीमध्ये केल्यास किडींच्या कमी पिढ्या तयार होतात, प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहील उदा. क्षेत्रीय पेरणीने ज्वारीची लागवड केल्यास मीज माशीचा प्रादुर्भाव कमी राहतो.
बिगर हंगामी पिकांची लागवड टाळावी. अशी लागवड केल्यास किडीस सतत खाद्य उपलब्ध होते. त्यामुळे किडींच्या अधिक पिढ्या निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढतो.
रोपांची योग्य अंतरावर लागवड केल्यास पिकामध्ये हवा खेळते, सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो. पीक निरोगी राहते, कीटकांना कमी संवेदनशील राहते.
बीजप्रक्रिया
बीज किंवा बेणे प्रक्रिया केल्यास किडींपासून पिकाचे कमी खर्चामध्ये जास्त दिवसांपर्यंत संरक्षण होते.
हळद, ऊस बेण्यास बेणे प्रक्रिया करावी. यामुळे हळदीमध्ये कंदमाशी, उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी राहतो.
पिकांची फेरपालट
ज्या भागात मागील वर्षी किंवा नियमित स्वरूपात किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो, तेथे प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी पिकांची योग्य फेरपालट करावी. एकाच गटातील पिकांची लागवड एकानंतर एक घेण्याचे टाळावे. उदा. कपाशीनंतर त्या शेतामध्ये भेंडी, अंबाडी किंवा त्या प्रकारचे पीक घेणे टाळावे. कपाशीची फेरपालट ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या पिकांसोबत केल्यास पांढरी माशी, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी राहतो.
सोयाबीननंतर भुईमुगासारखे पीक घेणे टाळावे. जेणेकरून पाने गुंडाळणारी अळी तसेच लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात राहतो. दरवर्षी एकाच शेतात सोयाबीन वर सोयाबीनचे पीक घेतल्यास चक्रीभुंगा, खोडमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.
मिरचीची लागवड सतत एका शेतात केल्यास फुलकिडे तसेच रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. पिकाची योग्य फेरपालट करून किडीची वाढ आणि प्रजनन क्षमतेला आळा घालावा.
आंतरपीक, सापळा पिकांची लागवड
शक्य असेल तिथे आंतर पिके घ्यावे. अनेक किडी प्रादुर्भावासाठी सर्व पिकांना प्राधान्य देत नाहीत, काही पिके ही प्रतिकारक म्हणून काम करतात. या पिकांची मुख्य पिकांसोबत आंतरपीक म्हणून लागवड केल्यास कीटक मुख्य पिकांपासून दूर राहतात, पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
सापळा पिकांची मुख्य पिकाभोवती लागवड केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव तिथे लवकर दिसून येतो. अशा ठिकाणी योग्य कीटकनाशकाची फवारणी करून किंवा नैसर्गिक शत्रूंना तिथे विकसित करून या किडींचे नियंत्रण करता येते. मुख्य पिकांचे होणारे नुकसान टाळता येते. उदा. कपाशीमध्ये झेंडू, मका, भेंडी, भगर यासारख्या पिकांच्या दोन ओळी लावल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. सोयाबीनमध्ये तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एरंडीची एक ओळ सभोवताली लावावी. कापसामध्ये उडीद, मूग, चवळी आणि मका या आंतरपिकांची लागवड केल्यास मित्र कीटकांची संख्या वाढते.
आंतरमशागत
खुरपणी, निंदणी, कोळपणी, भरणी यांसारखी आंतरमशागतीय कामे केल्यास जमिनीमधील किडींच्या सुप्त अवस्था नष्ट होण्यास मदत होते.
हळदीमध्ये मातीची भरणी केल्यास कंदमाशी, उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. कोळपणी केल्यास हुमणीच्या अळ्या उघड्या पडून नष्ट होतात.
आंतरमशागतीमुळे तणाचे व्यवस्थापन होते. तण हे मुख्य पिकासोबत अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करते. तणावर पर्यायी खाद्य वनस्पती म्हणून बरेच कीटक जगतात. तण व्यवस्थापन केल्यास पिकाशी अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा कमी होते, किडींचे व्यवस्थापन होते. उदा. कोळशी, पेटारी यासारख्या पर्यायी खाद्य तणांचे नियंत्रण केल्यास घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी होतो. फळातील रसशोषण करणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी गूळवेल, वासनवेल या वनस्पतींचे नियंत्रण करावे.
खते, पाण्याचा योग्य वापर
खतांच्या, विशेषतः नत्रयुक्त खतांच्या अतिवापरामुळे पीक हिरवेगार, लुसलुशीत बनते आणि किडींना आकर्षित करते. त्यामुळे अशा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर महत्त्वाचा आहे. शेणखत, सेंद्रिय खत आणि जैविक खतांच्या वापरास प्रोत्साहन द्यावे.
योग्य पाणी व्यवस्थापन कीड नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ शेतामध्ये पाणी साचून राहिल्यास पिके कीड, रोगास लवकर बळी पडतात. लष्करी अळी, हुमणी, टोळ किडीच्या नियंत्रणास सिंचनाचा वापर करता येतो.
छाटणी, विरळणी
फळझाडांची वेळोवेळी छाटणी करून किडीने प्रादुर्भावग्रस्त, मृत, तुटलेल्या फांद्या नष्ट कराव्यात. पिकामधील अतिरिक्त रोपांची विरळणी करावी. यामुळे खेळती हवा व मुबलक सूर्यप्रकाश राहिल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.
यांत्रिकी पद्धती
किडींचे अंडी पुंज, अळ्या आणि प्रौढ जिथे शक्य असेल तिथे हाताने वेचून जमा करून नष्ट केले जातात. उदा. सोयाबीनमधील तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळीचे अंडीपुंज आणि समूहातील लहान अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. हुमणीचे मोठे भुंगे, मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावेत.
पक्षिथांब्याचा वापर
शेतामध्ये इंग्रजी ‘T’ आकाराचे पक्षी थांबे लावावेत. सकाळी व सायंकाळी पक्षी बसून मोठ्या प्रमाणात अळ्या वेचून खातात.
प्रकाश सापळ्यांचा वापर
निशाचर किडी प्रकाश सापळ्यांकडे आकर्षित होतात. या किडी गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात. उदा. विविध पतंगवर्गीय किडींचे प्रौढ हे प्रकाश सापळ्याकडे आकर्षिले जातात.
कामगंध सापळ्याचा वापर
कामगंध सापळ्यांचा वापर किडींच्या निरीक्षणाकरिता, प्रजननामध्ये अडथळा निर्माण करण्याकरिता तसेच मोठ्या प्रमाणात प्रौढ पकडून नष्ट करण्याकरिता करावा. उदा. गुलाबी बोंड अळीसाठी कपाशीमध्ये निरीक्षणासाठी दोन आणि मोठ्या प्रमाणात पतंग पकडून नष्ट करण्यासाठी आठ ते दहा कामगंध सापळे प्रति एकरी लावावेत. काकडीवर्गीय पिकामध्ये फळमाशी, वांग्यामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावावेत.
चिकट सापळ्यांचा वापर
रस शोषण करणाऱ्या किडी जसे की, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे यासारख्या किडींसाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा. जाड पुठ्ठा किंवा डब्यावर चिकट पदार्थ लावून शेतामध्ये ठिकठिकाणी चिकट सापळे लावावेत. त्यावर लहान किडी आकर्षित होऊन चिकटून मरतात. उदा. कपाशी, भाजीपाला पिकामध्ये पिवळे चिकट सापळे पांढऱ्या माशीसाठी आणि निळे चिकट सापळे फुलकिड्यांकरिता उपयुक्त आहेत.
प्रादुर्भावग्रस्त भाग नष्ट करणे
किडीने प्रादुर्भावग्रस्त झाडांचा भाग किंवा पूर्ण झाड काढून ते किडीसह नष्ट केल्यास प्रादुर्भाव कमी राहतो. उदा. वांग्यामध्ये शेंडा अळी, सोयाबीनमध्ये चक्रीभुंग्याने प्रादुर्भावग्रस्त सुकलेले शेंडे, कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या आतील अळीसह वेळोवेळी जमा करून नष्ट करावेत.
शेताच्या बांधावर अडथळा
टोळ, केसाळ अळी, लष्करी अळी, गोगलगाय यांसारख्या किडी एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जाण्यास अडथळा निर्माण करून प्रादुर्भाव रोखता येतो. शेताच्या कडेने चर खोदल्यास किडींना अडथळा होतो.
फळांना आवरण
फळांना कापडी किंवा पॉलिथिन, मेणचट कागदी पिशव्या किंवा स्पंजच्या पिशव्यांचे आवरण लावल्यास किडींपासून संरक्षण होते. उदा. पेरू व सीताफळामधील फळमाशी, संत्र्यामधील रस शोषण करणारे पतंग, डाळिंबावरील फळ पोखरणारी अळी, फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फळांना आवरण घालावे.
खोडाभोवती चिकट
पदार्थ किंवा पत्रा लावणे
फळझाडाच्या खोडाभोवती जमिनीलगत चिकट पदार्थ किंवा पत्रा लावल्यास एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कीड पोहोचू शकत नाही उदा. नारळामध्ये उंदीर व मुंग्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खोडाला पत्रा लावल्यास फायदा होतो.
धूर करणे
संत्रा-मोसंबी बागेमध्ये सायंकाळच्या वेळेला धूर केल्यास फळातील रसशोषण करणाऱ्या पतंगाचे नियंत्रण करण्यास मदत होते.
आवाज करणारी यंत्रे, चमकणाऱ्या रिबिनीचा वापर
पक्ष्यांपासून भरडधान्य, फळबागेच्या संरक्षणासाठी आवाज करणारी यंत्रे किंवा चमकणाऱ्या रिबिनीचा वापर करावा.
चाळणी
साठविलेल्या धान्यातील कीड चाळणी किंवा उधळणी करून कमी करता येते.
जाळीचा वापर
जाळीचा वापर करून पक्षी, फुलपाखरे, पतंग, नाकतोडे, उसावरील पायरीला व इतरही किडींना येण्यापासून परावृत्त तसेच किडींना सहजरीत्या पकडून नष्ट करता येते.
भुंगे जमा करणे
पावसाळ्याच्या सुरुवातीला हुमणीचे भुंगे रात्रीच्या वेळी कडूनिंब किंवा बाभळीच्या झाडावर जमा होतात. या काळात ही झाडे हलवून खाली पडलेले भुंगे जमा करून रॉकेल मिश्रित किंवा कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून नष्ट करावेत. तुरीमध्ये दोन ओळींतील जागेमध्ये प्लॅस्टिकचे पोते अंथरून झाडे हलविल्यास खाली पडलेल्या अळ्या जमा करून नष्ट कराव्यात.
टोकदार आकड्याचा वापर
फळझाडांमध्ये विशेषतः नारळाच्या झाडातील भुंगा, आंब्यावरील भिरूड अशा किडींना मारण्यासाठी टोकदार आकड्याचा वापर करावा. किडीने पोखरून केलेल्या छिद्रामध्ये आकडा घालून आतील अळी बाहेर काढून किंवा आतमध्ये चिरडून मारावी.
- डॉ. दिगंबर पटाईत,
७५८८०८२०४०
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.