Nagpur News: राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त व वाजवी भाव मिळावा यासाठी ‘ई-नाम’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राष्ट्रीय बाजारतळ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी हे विधेयक सोमवारी (ता. ८) मांडले..या विधेयकामध्ये पणनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञांची समिती प्रस्तावित केली आहे. केंद्र व राज्य शासन, कृषी उत्पन्न बाजार समितीतील कृषी उत्पन्नाच्या व्यापारामधील अडसर कमी व्हावे यासाठी राज्यातील १३३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ई-नाम योजना राबविण्यात येत आहे. कृषी उत्पन्नाच्या व्यापारासाठी ऑनलाइन पद्धती कार्यान्वित करीत आहे..Agri Reforms: राष्ट्रीय बाजारतळ उभारणीसाठी अधिनियमात होणार सुधारणा.अशी असेल समितीराष्ट्रीय बाजारासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीचे अध्यक्ष पणनमंत्री असतील तर उपाध्यक्ष कृषी आयुक्त किंवा सहसंचालक दर्जाचा अधिकारी असेल. कार्यकारी संचालक कृषी पणन मंडळ किंवा सहकार विभागाचा सहनिबंधक असेल. महत्त्वाच्या बाजारातील चार शेतकरी, आवश्यक असल्यास अन्य राज्यातील एक एक शेतकरी, तीन लायसन्सधारक व्यापारी, कृषी प्रक्रिया उद्योगातील व्यक्ती किंवा भागीदार, आयात निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ आणि निमंत्रित सदस्य असे संचालक मंडळ असेल..Agri Finance Reforms : शेतकऱ्यांसाठी उपजीविका-आधारित कर्जपुरवठा.पण अजूनही राज्यात ई-नाम अंतर्गत ‘सिंगल युनिफाईड लायसन्स’ची तरतूद नसल्याने आंतरराज्यीय बाजार व आंतरराज्य व्यापार सुरू होऊ शकलेले नाहीत. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने कृषी उत्पन्न आणि पशुधन पणन (प्रचालन व सुविधा) अधिनियम, २०१७ (मॉडेल अॅक्ट) प्रकाशित केला आहे. या अनुषंगाने राज्याच्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यासाठी २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले होते..विधेयकातील तरतुदींबाबत सुधारणांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या उपसमितीने सुधारणांची शिफारस केली होती. त्यानुसार केंद्राच्या मॉडेल अॅक्ट मधील तरतुदीनुसार राज्यातील ज्या मोठ्या बाजार समित्यांकडे अन्य किमान दोन राज्यांतून शेतमाल येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय नामांकित बाजार समित्या घोषित करण्याची तरतूद करण्यात येणार आहे. ज्या बाजारातून शेतीमालाची खरेदी विक्री केली जाते त्या कोणत्याही बाजारास राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित करण्याची तरतूद प्रस्तावित विधेयकात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.