
Nashik news : नाशिक जिल्ह्यात जून-जुलै महिन्यातील थोड्याफार पावसाच्या ओलीवर पेरण्या झाल्या. अधूनमधून पडणाऱ्या सरींनी पिकांना जीवदान दिले. त्यामुळे बाजरी, मका, सोयाबीन, मुग, भुईमुगसारखी पिके जोमदार होती. मात्र, खंड पडल्याने आणि कडक उन्हामुळे सिन्नर, येवला, नांदगाव, चांदवड, मालेगाव आदी तालुक्यात पिके करपू लागली आहेत. पावसाभावी खरीप वाया जाण्याची स्थिती आहे, जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.
बियाणे मातीआड झाले, पिके अंकुरली, ती वाढूही लागली मात्र पावसाने खंड दिल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर पेरणीचे सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी ५ लाख ९७ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ९३ टक्के पेरा पूर्ण झाला;मात्र पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. सिन्नर तालुक्यात पेरा अजूनही निम्म्यावर आहेत. मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, बागलाण, सिन्नर तालुक्यांमधील बहुतांश भागाची पिके हातातून गेली आहेत. त्यामध्ये मका, सोयाबीन, बाजरी, कापूस, मुग पिके करपू लागली आहेत. खरीप पोळ कांदा लागवड हंगाम प्रभावित झाली आहे.
बागलाण(३), चांदवड(१०), देवळा(४), मालेगाव(१२), नांदगाव(११), सिन्नर(२) व येवला(१६) असे ५८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील ६७ गावे व ४० वाड्या असे मिळून १०७ ठिकाणी पाणीपुरवठा करावा लागत आहे. १ लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येसाठी त्यासाठी१२३ टँकरच्या फेऱ्या सुरु आहेत.
धरणांच्या पाणीसाठ्यात २८ टक्के तूट
जिल्ह्यात ७ मोठे, तर १७ मध्यम असे २४ प्रकल्प आहेत. यामधील संकल्पित उपयुक्त जलसाठा ६५ हजार ६६४ दलघफू इतका आहे. त्यामध्ये २२ ऑगस्टअखेर जिल्ह्यात ४२ हजार ९४० दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे, ही टक्केवारी ६५ असून मागील वर्षी ती ९३ टक्के होती. यंदा २८ टक्के तूट आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली, वालदेवी यासह सटाणा तालुक्यातील हरणबारी, केळझर ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर जिल्ह्यात तिसगाव, नागासाक्या व माणिकपुंज ही धरणे अद्यापही कोरडी आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९१ टक्के भरले आहे.
तालुकानिहाय झालेल्या पेरण्या (ता.२१ अखेर):
तालुका...क्षेत्र(हेक्टर)
मालेगाव...९९.४७ बागलाण...१०६.६३
कळवण...९९.७८ देवळा...९४.८३
नांदगांव...९२.१४ सुरगाणा...९४.८७
नाशिक...७७.८८ त्र्यंबकेश्वर...८५.५६
दिंडोरी...८१.७३ इगतपुरी...८७.१२
पेठ...८७.६७ निफाड...९९.१९
सिन्नर...५१.९४ येवला...१०७.२
चांदवड...९८.२३ एकूण...९३.११
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.