
Sekhar Gaikwad : एका गावात मानसिंग नावाचा एक शेतकरी राहत होता. आर्थिक अडचणीमुळे मानसिंगने आपला जमिनीचा प्लॉट विकायचे ठरविले. मानसिंगने जमिनीचा व्यवहार केला व खरेदीखतही केले. पण खरेदी खत करताना एकच प्लॉट रामेश्वर व गोविंदा या दोघांना विकला व खरेदीखतसुद्धा या दोघांच्या नावाने केले. काही दिवसांनंतर हे प्रकरण लक्षात आल्यानंतर रामेश्वर व गोविंदा या दोन खरेदीदार व्यक्तींमध्ये जोरदार वाद झाला. दोघांचा पण दावा होता, की हा प्लॉट मी खरेदीखताने रोख पैसे मोजून घेतला आहे. दोघांनी एकमेकांना खरेदीखत दाखवायला सांगितले. पण रामेश्वर व गोविंदा हे दोघेही आपल्याच मुद्यावर अडून होते, की मी रजिस्टर खरेदीखत केले आहे. तुझेच खरेदीखत खोटे असणार, तू कोर्टात जाऊन सिद्ध करून आण. त्यांचा हा वाद जवळपास एक महिना चालला, पण त्यात काहीही निर्णय झाला नाही.
शेवटी रामेश्वर व गोविंदाचे भांडण कोर्टात गेले. दोघांनी पण त्यांचे स्वतंत्र वकील लावले.
कोर्टाने दोघांच्याही वकिलांना रामेश्वर व गोविंदाच्या खरेदीखताच्या मूळ प्रति दाखल करण्यास सांगितले. दोन्ही खरेदीखते रजिस्टर होती. परंतु खरेदीखतांच्या तारखा मात्र वेगवेगळ्या होत्या. शेवटी कोर्टाने कायद्यानुसार अगोदरच्या तारखेचे खरेदीखत ग्राह्य धरले. त्यात रामेश्वरचे खरेदीखत हे अगोदरच्या तारखेचे होते व गोविंदाचे खरेदीखत हे नंतरच्या तारखेचे होते. त्यामुळे गोविंदाला मनस्ताप झाला व त्यात त्याचे प्रचंड नुकसान पण झाले.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे परीक्षेची वेळ आली, की सत्य काय ते बाहेर येते. कायद्यानुसार पहिले खरेदीखत कायदेशीर असल्यामुळे दुसऱ्यांदा जमीन विकण्याचा मूळ मालकाला हक्क उरत नाही.
जमीन खरेदी करण्यापूर्वी...
एका गावात देविदास नावाचा एक शेतकरी राहत होता. देविदासला त्याची जमीन विकायची होती. गावातील एक महादेव नावाचा शेतकरी व देविदास यांची भेट झाली. देविदासने महादेवला जमीन घेणार का, असे विचारले, तेव्हा महादेव जमीन घ्यायला लगेच तयार झाला. जमीन विक्री करताना देविदासने जमिनीमध्ये विहीरसुद्धा असल्याचे सांगितले. जमीन विक्री करताना देविदासने अतिशय गोड बोलून व घाईघाईने रोख पैसे घेऊन खरेदीखत महादेवच्या नावावर करून दिले. देविदासचे जवळचे नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगून खरेदीखत झाल्यावर दुसऱ्या दिवशी शहरात राहायला निघून गेला. खरेदीखताप्रमाणे दोन महिन्यांनी महादेवचे नाव सातबारा उताऱ्यास लागले.
पिकांचा पहिला हंगाम संपल्यानंतर महादेवने जमीन मोजणी कार्यालयाकडून शासकीय मोजणी करून घेतली. मोजणीमध्ये ती जमीन पंधरा गुंठे कमी भरली आणि शिवाय जी विहीर खरेदी घेतलेल्या जमिनीत असल्याचे सांगितले होते, ती सुद्धा सामायिकात व बांधावर असल्याचे लक्षात आले. त्यामुळे बांधापलीकडचे शेतकरी आता खरेदी घेणाऱ्या बरोबर, म्हणजे महादेव सोबत दररोज भांडण करू लागले. याचा पश्चात्ताप महादेवला फार झाला, पण त्यात महादेवची चूक होती हे त्याच्या लक्षात आले. देविदासने आपल्याला घाईमध्ये जमिनीचा व्यवहार करून फसवले हे त्याच्या लक्षात आले. आपण इतक्या घाईमध्ये या जमिनीचा व्यवहार करायला नको होता. परंतु वेळ निघून गेल्यावर महादेवला काहीही करता येत नव्हते.
सांगावयाचे तात्पर्य म्हणजे जमीन खरेदी करण्यापूर्वी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा किती क्षेत्रावर आहे हे पाहणे हिताचे! बांधावरची विहीर किंवा झाडे यामध्ये शेजारचे शेतकरीसुद्धा हिस्सेदार आहेत का, हे निश्चितपणे तपासणे फार गरजेचे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.