Almatti Dam Water Level : ‘कृष्णा लवाद क्रमांक- २’च्या निकालानुसार राज्याला १३० टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्याचे आवाहन आधीच केंद्र शासनाला करण्यात आले आहे. आलमट्टी जलाशयाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.५ मीटर करणे आवश्यक आहे.
मात्र याबाबत केंद्र सरकारची अधिसूचना येणे बाकी असल्याने लगेच उंची वाढवता येणार नाही. त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची गरज आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज आलमट्टी येथे दिली.
बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते जलाशयाचे पाणी पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आलमट्टी जलाशयाची उंची कोणत्याही स्थितीत वाढवली जाईल, असे सूतोवाच त्यांनी केले.
ते म्हणाले, मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच पंतप्रधान आणि संबंधित केंद्रीय मंत्र्यांना भेटून कृष्णा लावादाच्या अंतिम निकालासाठी केंद्र सरकारकडून राजपत्र अधिसूचना जारी करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात आम्ही पुनर्वसन आणि पुनर्बांधणीसाठी तयार आहोत.
आमच्या सरकारच्या मागील काळात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ५१,१४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. आता ही रक्कम अंदाजे ८० हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. दरवर्षी २० हजार कोटी रुपये खर्च करून, आमचे सरकार ५ वर्षांत अंदाजे १ लाख कोटी खर्च करणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्र सरकारकडून अधिसूचना काढली जाणे आवश्यक आहे. पंतप्रधानांच्या मध्यस्थीने निर्णय झाल्यास आलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्याचा प्रकल्प सुरू करता येईल.
कृष्णा लवाद १ च्या निर्णयानुसार, कृष्णा अप्पर प्रकल्प १ आणि २ अंतर्गत १६.४७ लाख एकर क्षेत्रासाठी १७३ टीएमसी पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. आलमट्टी जलाशयाची उंची वाढवून एकूण ५.९४ लाख हेक्टर (१४.६८ लाख एकर) क्षेत्राला प्रकल्पाद्वारे सिंचन केले जाऊ शकते. बंगळूरमधील बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, कोप्पळ, रायचूर, बल्लारी, येथील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुनर्वसन आणि पुनर्बांधणीच्या कामांबाबत लवकरच चर्चा करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
एकीकडे आलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाकडून विरोध होत असताना, कर्नाटक शासन मात्र उंची वाढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. स्वतः मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि याबाबत सुतोवाच केल्यामुळे जलाशयाची उंची वाढविली जाणार हे आता नक्की झाले आहे. कर्नाटकाच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची शक्यता आहे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.