Orange Farming Management :
शेतकरी नियोजन
पीक : संत्रा
शेतकरी : रमेश जिचकार
गाव : नागझिरी, ता. वरुड, अमरावती
संत्रा लागवड : २० एकर
एकूण संत्रा झाडे : ३००० झाडे
मोसंबी लागवड : २ एकर (६०० झाडे)
अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन तालुके संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असेही म्हटले जाते. वरुड तालुक्यातील नागझिरी या परिसरात संत्रा, मोसंबीसोबतच कपाशी व त्यात तुरीचे आंतरपीक अशी पीक पद्धती आहे.
नागझिरी येथील रमेश जिचकार यांनी १९८३ मध्ये कृषी पदवीधर झाल्यानंतर १९८४ ते २००४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य सहकारी तेलबिया उत्पादक महासंघ (जळगाव-खानदेश) या महामंडळात नोकरी केली. त्यानंतर २००४ मध्ये महामंडळाच्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेत पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये लक्षकेंद्रित केल्यानंतर रमेश यांनी आजोबा भगवान जिचकार आणि वडील परशरामजी जिचकार यांच्याकडून मिळालेल्या संत्रा बाग व्यवस्थानाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.
संत्रा लागवड
रमेश जिचकार यांच्याकडे २० एकरांत संत्रा लागवड आहे. त्यापैकी नागझिरी येथे ७ एकरांत संत्र्याची १३०० झाडे, तर गोरेगाव येथे १३ एकरांत १७०० झाडे आहेत. गोरेगाव येथील लागवड ही दोन क्षेत्रांत विभागली आहे. त्यापैकी ९ एकरांतील लागवड १५ बाय १५ फूट अंतरावर, तर २ एकरांतील लागवड ही अतिघन पद्धतीने करण्यात आलेली आहे. अतिघन लागवडीतील झाडे ७ वर्षे वयाची आहेत. तर उर्वरित सर्व क्षेत्रातील झाडे १७ वर्षे वयाची आहेत. याशिवाय २ एकरांत मोसंबीची ६०० झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. संत्रा लागवडीमध्ये मृग आणि आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते.
आंबिया बहर व्यवस्थापन
आंबिया बहरासाठी १५ नोव्हेंबरच्या दरम्यान बाग ताणावर सोडली. ताण कालावधीत प्रति झाड दोन टोपली प्रमाणे शेणखत मात्रा दिली.
त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रासायनिक खतांची पहिली मात्रा दिली. त्यात २०ः२०ः०ः१३ आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा वापर करण्यात आला. ही खतमात्रा ताण तोडण्यापूर्वी देण्यात आली.
साधारण १५ जानेवारीच्या दरम्यान बागेला ठिबकद्वारे सिंचन करत ताण तोडला. ताण तोडतवेली पहिले पाणी हलकेच म्हणजे ५ ते ६ तास दिले. त्यानंतर ४ दिवसांनी पाण्याचा कालावधीनंतर हळूहळू वाढवित नेला.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवीन आलेल्या पालवीवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक रासायनिक फवारण्या घेतल्या आहेत.
फेब्रुवारी महिन्यात झाडांवर फुलधारणा होण्यास सुरुवात झाली. या काळात बागेत सिट्रस सायला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली. या फवारणीमुळे किडीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली.
संत्रा लागवडीत सिंचनासाठी डबल लाइन ड्रीपचा वापर केला आहे. ताण तोडल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून दर आठवड्याला सिंचनाचे काटेकोर नियोजन केले आहे. जमीन भारी प्रकारची असल्यामुळे सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे रमेशराव सांगतात.
याच कालावधीत ठिबकद्वारे रासायनिक खतांची दुसरी मात्रा २०ः५२ः३४ ची मात्रा देण्यात आली.
मागील कामकाज
मागील आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. सततच्या पावसामुळे बागेत बुरशीचा प्रादुर्भाव वाढला असून फळगळ होण्याची शक्यता आहे. फळगळ होऊ नये यासाठी उपाय करण्यात आले.
बागेत ट्रायकोडर्मा, एनपीके, स्युडोमोनास, गुळाचे पाणी आणि ताक यांचे मिश्रण शेणखतामध्ये तयार करण्यात आले. हे मिश्रण आठ दिवस ठेवण्यात आले. तयार मिश्रण बागेमध्ये विरळ स्वरूपात फेकण्यात आले. संत्रा व मोसंबीच्या ३६०० झाडाला हे मिश्रण मिळावे याप्रमाणे त्याचा वापर करण्यात आला.
बागेत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावले आहेत. याशिवाय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रायायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली आहे.
आगामी नियोजन
सध्या बागेतील झाडांवर लिंबू आकारापेक्षा थोडी मोठ्या आकाराची फळे लागलेली आहेत. फळांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी निरीक्षण करून योग्य उपाय करण्यावर भर देणार आहे.
सततच्या पावसामुळे बागेत गवत चांगलेच वाढले आहे. वाढलेले गवत ग्रासकटरच्या साह्याने कापले जाईल.
कोळशीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेणार आहे.
रासायनिक खतांचा तिसरा डोस पुढील काळात देणार आहे. त्यात १०ः२६ः२६ चा वापर केला जाईल. जेणेकरून फळांचा दर्जा राखला जाईल.
फळांच्या वजनामुळे लहान झाडे वाकण्याची किंवा मोडण्याची शक्यता असते. झाडांना आधार मिळण्यासाठी बांबूच्या काठीचा वापर केला जाईल. जेणेकरून फळांच्या वजनामुळे झाड वाकणार नाही.
साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी फळ काढणीस सुरुवात होईल. टप्प्याटप्प्याने फळांची काढणी केली जाईल. एकरी साधारणपणे ८ ते ९ टन उत्पादन अपेक्षित आहे.
पावसाने उघडीप दिल्यास मृग बहरातील झाडावरील वाळलेल्या तसेच रोगट फांद्या काढून घेण्याचे काम केले जाईल.
डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पावसाळा संपताच झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावली जाईल.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून विक्री
रमेश यांच्यासह काही संत्रा उत्पादकांनी एकत्रित येत २०१५ मध्ये श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनीची स्थापना केली. कृषी विभागाच्या गटशेती कार्यक्रमातून प्रति दिन १०० मेट्रिक टन क्षमता असलेला संत्रा ग्रेडिंग, वॅक्सिंग, कोटिंग आणि पॅकेजिंग करण्याचा प्रकल्प उभारला आहे. आज या कंपनीमध्ये सुमारे ५५० संत्रा उत्पादकांचा समावेश आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडीन संत्र्याची विक्री केली जाते. तसेच कंपनीच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांसाठी वेळोवेळी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. रमेश जिचकार यांनी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था तसेच राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेचे सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
रमेश जिचकार, ९८२३२५३५०१
(शब्दांकन : विनोद इंगोले)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.