

Raigad News: ‘‘छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेवू नका, त्यातून देश आणि जगाला प्रेरणा घेऊ द्या, अशी विनंती मी महाराष्ट्रातील जनतेला करतो,’’ असे आवाहन केंद्रीय गृह आणि सहकारीमंत्री अमित शहा यांनी केले.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या ३४५ व्या पुण्यतिथिनिमित्त आयोजित कार्यक्रमात शनिवारी (ता. १२) मंत्री शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिकमंत्री ॲड. आशिष शेलार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खासदार उदयनराजे भोसले, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, स्थानिक उत्सव समिती महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित उपस्थित होते.
या वेळी शहा म्हणाले, ‘‘राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुनरुद्धार करण्याची प्रेरणाही दिली. हिंदवी स्वराज्याचा विचारही जिजाऊंनी बाल शिवाजींना दिला. मात्र १२ वर्षांच्या बालकाने देशात भगवा फडकविण्याचा निश्चय केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अल्पावधीतच अटक ते कटक, बंगाल, दक्षिणेपासून गुजरातसह संपूर्ण देशाचे स्वराज्याचे स्वप्न सफल केले. मी अनेकांची चरित्रे आजवर वाचली आहेत, मात्र इतकी दृढ इच्छाशक्ती, अगम्य साहस, अकल्पनीय रणनीती आणि समाजातील सर्व वर्गांना एकत्र करून अपराजित सैन्याची स्थापना शिवरायांशिवाय कोणाला जमले नाही.’’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट केला पाहिजे. मात्र आपण आता लोकशाहीत आहोत. त्यामुळे लोकशाहीनुरूप नियम करण्याचे काम निश्चितपणे केले जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनाचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू आहे.’’ दरम्यान, मंत्री शहा यांनी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
शिवरायांचा अपमान रोखण्यासाठी कायदा करा
छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांचा अवमान सातत्याने केला जात आहे. या घटना वाढताना दित आहेत. हे टाळण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. कायदा असा करा, की ज्यामध्ये जामीन मिळणार नाही आणि दहा वर्षे कारागृहाची शिक्षा असेल. संपूर्ण शासनमान्य असा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
महात्मा फुलेंचा उल्लेख नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समिधी जीर्णोद्धाराला १०० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख काही मान्यवरांनी भाषणात केला. मात्र समाधी शोध आणि जीर्णोद्धारासाठी विशेष काम केलेल्या महात्मा जोतिबा फुले यांचा उल्लेख एकाही वक्त्याने केला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र शहा यांनी लोकमान्य टिळकांचा उल्लेख आवर्जून केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.