Pune News : राज्यात गेल्या ४ महिन्यांपासून पोलीस पाटिलांचे मानधन रखडले आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.३१) नागपूर येथे पोलीस पाटिलांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावू असा दावा करताना, सोमवारी (ता. २) शासन निर्णय निर्गमीत केला जाईल अशी ग्वाही दिली. तसेच पोलीस पाटिलांच्या सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू असे म्हटले आहे. ते येथील हनुमान नगर भागातील डॉ. ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ‘महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या ८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, परिणय फुके, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ, महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघांचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे-पाटील, कार्याध्यक्ष परशुराम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, राज्यातील पोलीस पाटील रचनेला २००० वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. पोलीस पाटील गावाचे गृहमंत्री असतात. ते गावचा कायदा सुव्यवस्था राखण्यासह महिला सुरक्षाचे महत्वाचे कर्तव्य आहे. त्यामुळे पोलीस पाटीलांनी पोलिस अधिकाराबरोबर कार्य करावे. तर पोलीस पाटलांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी १५ हजार रुपये मानधन दिल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रखडलेल्या ४ महिन्यांच्या मानधनावरून फडणवीस यांनी गृह विभागाच्या अपर सचिवांना सूचना करताना २ सप्टेंबरला शासन निर्णय निर्गमित करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या मुद्द्यावर राज्य सरकार सकारात्मक असून सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधितांशी चर्चा करू, असेही आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.
तसेच पोलीस पाटलांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारचे उपचार दिले जातील. पोलीस विभाग व महसुली अधिकाऱ्यांकडून पोलीस पाटलांचा अपमान होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.