कॉलेजचे विद्यार्थी

महाविद्यालयीन जीवन खडतर असले तरी एकमेकांच्या मदतीने विद्यार्थी शिकत असतं. पूर्वी जुनी दहावी आणि पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना आपोआप नोकऱ्या मिळत असतं. संधी मिळेल तेव्हा विद्यार्थी पैसे वाचवून सिनेमा पाहण्याचा आनंद लुटत असतं.
Collage Students
Collage StudentsAgrowon

शेखर गायकवाड

१९०० साली ग्रामीण भागातून महाविद्यालयात शिकायला जाणारा विद्यार्थी आणि २०२२ सालचा विद्यार्थी यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे. एकतर दोन-तीन हजार लोकसंख्येच्या छोट्या गावातून एक किंवा दोन विद्यार्थी तालुका, जिल्हा पातळीवर किंवा मुंबई, पुणे, अलाहाबाद या ठिकाणी शिकायला जात असतं. बहुतेकवेळा शिकायला जाताना फी भरायची तरतूद, जाण्या-येण्याचा खर्च आणि थोडे दिवस जेवण करायचा खर्च अशी तयारी करून कोणाच्या तरी मदतीने विद्यार्थी महाविद्यालयात जात. गरीब मुले जेमतेम दोन किंवा तीन ड्रेस बरोबर आणत. बहुसंख्य विद्यार्थी १९४०-५० सालापर्यंत धोतर घातलेले, १९५०-८० दरम्यान पायजमा घातलेले व १९८० च्या नंतर पँट-शर्ट घालणारे असतं.

अतिशय जुन्या व ऐतिहासिक महाविद्यालयांमध्ये वसतिगृहाची सोय असायची. कोणाच्या ओळखीने किंवा नातेवाइकांकडे काही दिवस राहण्याची सोय याची खात्री करून विद्यार्थी शिकायला जात. अलाहाबादला शिकायला जाणारे विद्यार्थी जेव्हा रेल्वेचे तिकीट ४०-५० रुपये असे होते, त्याकाळात केवळ ६०-७० रुपये घेऊन शिकायला बाहेर पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. महाविद्यालयाची फी भरायला पैसे साठवल्यावर त्यातले काही पैसे एसटीसाठी प्रवासाला खर्च होतील म्हणून १९५६ साली चांदवड ते नाशिक असा ५० किमीचा प्रवास पायी चालत नाशिकच्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचे एक उदाहरण मला माहिती आहे.

इतरांच्या तुलनेत वसतिगृहाची फी भरण्याची ऐपत असणारे पालक तुलनेने आर्थिकदृष्टया बरे असतं. वसतिगृहातील खोल्यामध्ये सुद्धा एक टेबल, एक लाकडी खुर्ची, एक दिवा व पुस्तके ठेवण्यासाठी भिंतीत बसवलेले एक कपाट, कॉट एवढी सामग्री असे. वसतिगृहापासून काही अंतर चालत जाऊन स्वत: ची बादली, तांब्या, साबण घेऊन अंघोळ करण्याची व्यवस्था फर्ग्युसनसांरख्या महाविद्यालयात १९९० पर्यंत होती. वसतिगृहात प्रवेश मिळाल्यावर वाडी-वस्ती वरून जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत जणू तो काही परदेशी शिकायला चालला आहे. आणि तो आता कित्येक वर्षे भेटणार नाही अशी भावना आई-वडिलांच्या मनात असे. १९७०-८० पर्यंत मुलांच्या प्रवेशासाठी पालक प्रवेशासाठी अगोदर हेलपाटे मारत असतं. ज्यांचे आई-वडील पूर्ण अडाणी आहेत, अशा वेळी शहरीभागात व्यवसाय करणारे चुलते / काका व इतर नातेवाईक यांची मदत होत असे.

एखाद्या गरीब मुलाला दहावीला चांगले गुण असूनसुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे आई-वडिलांनी दहावी झाल्यावर शेतातील कामे करण्यासाठी, गुरे सांभाळण्यासाठी, लहान भावंडे सांभाळण्यासाठी त्याला घरी ठेवल्यावर त्याला शिकवणारे शिक्षक पहिल्यांदा अस्वस्थ होत असतं. त्या मुलाच्या भवितव्याचे नुकसान करू नका व मुलाला पुढे शिकवण्याची गळ पालकांना घालत. कित्येक शिक्षक स्वत:च्या पगारातून काही फी देण्याची तयारी दाखवत असतं. प्रत्यक्षात महाविद्यालयात प्रवेश घेतानासद्धा शेतातून गावापर्यंत पायीप्रवास, नंतर एसटी, रेल्वेमध्ये प्रवास, अंधाऱ्या रात्री किंवा पावसामध्ये महाविद्यालयापर्यंत केलेली पायपीट, उशिरा पोहोचल्यामुळे मेस बंद झाल्यानंतर थोडे पाणी पिऊन पहिल्या रात्री विचारांच्या कोलाहलात घालवलेली पहिली रात्र हे महाविद्यालयात शिकणाऱ्या पहिल्या पिढीच्या वाट्याला आले.

बनारस विद्यापीठात शिकायला जाणारे कित्येक मुले वार लावून वेगवेगळ्या कुटुंबांकडे जेवत असतं. राहण्याची सोय मात्र बनारसच्या वेगवेगळ्या धर्मशाळांमध्ये होत असे. धर्मशाळेचे पण काही कडक नियम होते आणि धर्मशाळा झाडणे, आडाचे पाणी शेंदून आणणे किंवा व्यवस्था पाहणाऱ्या कुटुंबाकडे काही काळ विद्यार्थ्यांना मदत करावी लागायची. अनेक जणांना जुनी अकरावी पास झाल्यावर पहिल्यांदा महाविद्यालयात जाताना पँट-शर्ट घालण्याची वेळ यायची. तो पर्यंत अनेक मुले हाफ विजारी किंवा पायजमा शर्ट घालत असतं. ग्रामीण भागातून शहरात येणारी मुले बुजरी असतं. काही शिक्षकसुद्धा हुशार विद्यार्थ्यांना वाड्यात किंवा घरात राहायला जागा देत असतं.

जमीन कसणाऱ्या कुळांची मुले सर्रास अकरावीच्या परीक्षेला मालकांच्या घरी उतरत. राहण्याचे ठिकाण आणि महाविद्यालय लांब असेल तर १०-१५ रुपयांत त्या वेळी मिळणारी सायकल विद्यार्थी वापरत. ३०-४० कि.मी अंतर असलेल्या गावांमधून एसटीने डबे येत असतं. त्याकाळी दररोज मुलांना वेगवेगळ्या भाज्या देण्याची कल्पकता व उपलब्धताही नसायची. चटणी व बटाट्याची भाजी बहुसंख्य मुलांच्या डब्यामधे यायची. दोन-दोन डबे विकत घेण्याची पालकांची ऐपत नसायची उन्हाळ्यात उष्णतेमुळे भाकरी वाकड्या-तिकड्या होत, तर कधी भाजी खराब होत असे. अशावेळी डबे खाणारे इतर मित्र मदतीला येत.

नव्वदच्या दशकापर्यंत शिकायला येणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांची परिस्थिती सर्वांची सारखी व बेताची असे. आताच्या सारखी एवढी विषमता त्याकाळी नव्हती. वसतिगृहाचे रेक्टर अतिशय कडक असतं. वसतिगृहात राहणारी मुले सर्वांना वैयक्तिकरित्या ओळखत असतं. हळूहळू एकाच भागातील विद्यार्थ्यांच अधिक जवळीक झाल्यामुळे ग्रुपने ओळखले जात. त्यांचे सुट्टीमध्ये एकमेकांच्या घरी जाणे असायचे. कोणत्या विषयाचे शिक्षण घ्यायचे हेसुद्धा शिक्षकांमुळे, काही शिकलेल्या नातेवाइकांमुळे व मोठ्या लोकांच्या मार्गदशनामुळे ठरत असे. संपूर्ण राज्यात नागपूर, अमरावती, मुंबई, पुणे ,सोलापूर या काही निवडक ठिकाणी प्रसिद्ध महाविद्यालय असल्यामुळे ५-६ जिल्ह्यांतून विद्यार्थी तेथे प्रवेश घेत. फर्ग्युसन, डेक्कन, किंवा टाटा इन्स्ट्ट्यिटसांरख्या ऐतिहासिक महाविद्यालयात अनेक देशातून आणि भारतातील अन्य राज्यातील विद्यार्थी येत. सर्रासपणे नेपाळ, भूतान, केनिया, इजिप्त, थायलंड अशा देशांचे विद्यार्थी शिकायला येत. वसतिगृहामध्ये एखादी कॉमन रूम, वर्तमानपत्रे, कॅरम आणि टेबल-टेनिससारखे जुजबी साहित्य असायचे. निवडक वृत्तपत्रे आणि आकाशवाणी हे माहितीचे मुख्य स्त्रोत होते. वसतिगृहातून गावी असलेल्या आई-वडिलांना पोस्टकार्ड पाठवले जाई. फी भरण्यासाठीसुद्धा मनीऑर्डरने पैसे मागवावे लागत असतं. वसतिगृहातील मुलांकडून निकडीच्या वेळी २ रुपये, ५ रुपये उसने घेऊन त्याची नोंद छोट्या डायरीमध्ये होत असे.

महाविद्यालयीन जीवन खडतर असले तरी एकमेकांच्या मदतीने विद्यार्थी शिकत असतं. पूर्वी जुनी दहावी आणि पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना आपोआप नोकऱ्या मिळत असतं. संधी मिळेल तेव्हा विद्यार्थी पैसे वाचवून सिनेमा पाहण्याचा आनंद लुटत असतं. सिनेमाला चोरून जाणारा विद्यार्थी बिछान्यावरील उशी, रजाई अशी पसरून ठेवायचा की असे वाटावे की विद्यार्थी तेथे झोपला आहे. वसतिगृहात कोणाचेही पालक भेटायला आले की त्यांनी आणलेला खाऊ अर्ध्या तासात ग्रुपमधले विद्यार्थी फस्त करीत. सहजीवनाची खरी सुरुवात वसतिगृहात महाविद्यालयीन काळात होत असे आणि एकाच वेळी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी एकमेकांचे आयुष्भर जिगरी मित्र बनत. शेवटच्या वर्षी मात्र आपल्या भवितव्याच्या बाबतीत चिंतीत असतं. पोटा-पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी राज्यात किंवा आणखी कोणत्याही ठिकाणी नोकरी मिळाली तरी त्यांची जगण्याची तयारी असे. आतासारखे महाविद्यालयात प्रवेश घेताना स्वागत, कॅम्पसची ओळख, अद्ययावत वसतिगृह, स्वीमिंग पूल, कॅफेटेरिया, कंझ्युमर शॉपी, वाय-फाय, ट्रॉलिबॅग, मोबाईल, स्कूटर, मोटारसायकल, स्पोर्ट्स शूज, जर्सी, इत्यादी अनेक गोष्टींचा काही दशकांपूर्वी गंधही नव्हता यावर आता कोण विश्वास ठेवणार...?

ई-मेल- shekharsatbara@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com