

‘परिस्थिती स्वतःहून बदलत नसते, ती बदलण्यासाठी स्वतः ला बदलावं लागतं.’ या ओळीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बालशिक्षण प्रणेत्या पद्मभूषण ताराताई मोडक. ‘बालके हीच पृथ्वीवरील दैवते आहेत.’ हा अनमोल संदेश जगाला देणाऱ्या ताराताईंच्या हातून बालशिक्षणाचे फार मोठे कार्य व्हायचे होते. एक-दोन मुलांचा छोटा संसार त्यांना करायचा नव्हता तर देशांतील अनंत बालकांच्या शिक्षणाचा जटिल प्रश्न सोडवून देशात बाल शिक्षणाची एक नवी प्रणाली सुरू करायची, यासाठीच जणू त्यांचा जन्म झालेला होता.
ताराताईंचा जन्म १९ एप्रिल १८९२ रोजी झाला. त्यांच्या लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत आणि मुंबई अलेक्झांडर गर्ल हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले. एलिफिस्टन महाविद्यालयातून त्यांनी बीए ची पदवी मिळवली. पूर्वाश्रमीच्या त्या केळकर घराण्याच्या. १९१५ मध्ये अमरावतीचे प्रसिद्ध वकील के. व्ही. मोडक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९३६ ते १९४८ त्या काळात मुंबई येथील शिशुविहार येथे बालशिक्षणाच्या प्रसाराचे कार्य तर नंतर बोर्डी, कोसबाड या ठिकाणी बालशिक्षणाचे अनेक नवनवीन प्रयोग ताराताई यांनी बालशिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेका आणि ताराताईंच्या शिष्या अनुताई वाघ यांच्या समवेत केले.
महात्मा गांधीच्या आदेशानुसार व शिक्षण महर्षी भारतरत्न कर्वे यांच्या सूचनेप्रमाणे खेड्याकडे जाण्याची प्रेरणा त्यांनी ती तितकीच सार्थकी ठरवली. देशातील पहिली बालवाडी बोर्डीला सुरू झाली होती. ताराताईंचे शिक्षण विषयक, निसर्गविषयक विचार अत्यंत दूरगामी होते.
निसर्ग परिचय हा ही, मनुष्य परिचयाइतकाच विशाल आहे. आत्मविकासाची खरी दिशा शिक्षकांपुढे असली, तरच तो बालकाला त्या मार्गाने जाण्यास मदत करू शकेल. बालकांना बोन्साय करू नका तर वटवृक्ष करा. बोन्साय फक्त घराला, तर वटवृक्ष संपूर्ण परिसराला शोभा आणतो. असे त्यांचे मूलगामी विचार होते. राजकोट येथील चांगला पगार, गाडी-बंगला, नोकर, मान-सन्मान या सर्वांचा त्याग करून त्या बालशिक्षणाच्या प्रयोगात सामील झाल्या.
‘डोंगर दऱ्या तुडवत
आल्या त्या कोसबाडला
‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’
अशी सखी होती सोबतीला’
कोसबाड येथे ताराताई, अनुताईंनी बालवाडी, पाळणाघर, विकासवाडी प्राथमिक शाळा, विकासवारी या विद्यालय, कुरणशाळा, रात्रशाळा, अंगणवाडी प्रशिक्षण केंद्र, रात्रशाळा, विकास मुद्रणालय असे अनेक उपक्रम बालकांसाठी, आदिवासींच्या प्रगतीसाठी सुरू केले. बालकांचा विकास होण्यासाठी त्यांनी जी पुस्तके लिहिली त्यात पालकांसाठी सुद्धा उपदेशक अशी पुस्तके आहेत. ‘पंढरीला जाऊन विठोबाचं दर्शन घ्यावं, आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या पायांवर डोकं ठेवावं, देहूला जाऊन तुकोबांना भेटावं तसेच प्रत्येक शिक्षण प्रेमीने कोसबाडच्या या तारा-अनुताईंच्या समाधीच दर्शन घ्यावं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.