Sant Gadge Baba: गाडगे बाबा नावाचा अवलिया

तायबाईला पश्चाताप झाला. दमलेल्या, भुकेलेल्या अवस्थेत आपण उगीच त्या भुकेल्या माणसावर चीडचीड केली. पाटीतलं कालवण सांडून गेलं. आता खळ्यावर गेल्यानंतर कारभाऱ्याचं बोलणं खावं लागणार होतंच, शिवाय नुसती भाकर कशाशी खाणार ?
Sant Gadge baba
Sant Gadge babaAgrowon

शंकर बहिरट

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. तेव्हा पुणे हे छोटे शहर होते. म्हणजे आताच्या एखाद्या मोठ्या गावासारखेे. आजूबाजूला जंगल, गवताळ रान, शेती, त्यातून नागमोडी वळणे घेत शेजारच्या खेडेगावांना जोडत जाणाऱ्या गाडीवाटा. त्याच वाटेने जाता जाता गवनेर (गव्हर्नर) बंगला लागतो आणि जवळच औंध हे एक छोटेसे खेडेगाव.

सुगीचे दिवस. कुणाच्याच पायाला थारा नसतो. कुणाची शाळू काढणी चालू असते, कोण पेंढ्या बांधतो तर कुणाची बैलगाडीत हेल रचून खळ्यावर आणायची लगबग चालू असते. शेतकरी महिलांना मात्र या दिवसात श्वास घ्यायला उसंत नसते.

पहाटे लवकर उठून सगळी घरची कामे उरकायची आणि दिवसभर शेतात काम करून पुन्हा संध्याकाळी उशिरापर्यंत घरातली कामं करायची. त्यात ती लेकुरवाळी असेल तर बिचारीच्या अंगावर मुठभर मास राहत नाही. अशीच सुगीची लगबग चालू होती.

तायबाईने लगबगीने घरची कामं उरकली. पाटीत भाकरी, कालवण, थोडी चटणी, दही आणि पाण्याची चरवी ठेवली. पदर सावरून डोक्यावर पाटी घेतली आणि शेताकडे झपाझप निघाली. तायबाई सासुरवाशिन, पहाटे पासूनच्या कामाने दमली तर होतीच शिवाय भुकेलीही होती. खळ्यावर कारभाऱ्याची न्याहारी झाल्यावरच तिची न्याहारी होणार होती. गावापासून शेत मैलभर दूर असेल. झपाझप पावलं टाकत तिने गावची वेस ओलांडली आणि शेताची पाऊलवाट धरणार तोच.

" माय, भाकर वाढ मले. लय भूक लागलीय " समोरून आवाज आला तशी तायबाई थबकली.

अंगात चिंध्याची कपडे घातलेला, दाढी वाढलेला एक भिकारी गयावया करत होता. तायबाई मुलखाची लाजाळू. तिने मान वळवली आणि पदरात तोंड लपवलं. "आरं बाबा चल खळ्यावं, जास्तीच्या भाकरी हायेत, तिथं गेल्यावं देते."

"माय, हितंच दे मले उलीशिक "

"ए बाबा, हा काय कहार हे ? नाय देत जा ! मला उशोर व्हतोय, तिकडं कारभारी वाट बघत आसंल !"

तायबाई वैतागली आणि लगबगीने निघाली. गडबडीत दगडाला ठेचाळली तशी तोल सावरता सावरता डोक्यावरून पाटी निसटली. तिने चपळाईने कशीबशी पकडली पण पाटीतले काही कालवण, चरवीतले पाणी आणि दही खाली सांडले. तिने मागे वळून पाहिले दूरवर कुणीच दिसत नव्हते.ती चक्रावली...

तो भिकारी अचानक कुठे गायब झाला होता.

तायबाईला पश्चाताप झाला. दमलेल्या, भुकेलेल्या अवस्थेत आपण उगीच त्या भुकेल्या माणसावर चीडचीड केली. पाटीतलं कालवण सांडून गेलं. आता खळ्यावर गेल्यानंतर कारभाऱ्याचं बोलणं खावं लागणार होतंच, शिवाय नुसती भाकर कशाशी खाणार ? किमान राहिलेल्या भाकरी तरी त्या माणसाच्या मुखी लागतील असे तिला वाटले, पण तो माणूस असा अचानक कसा दिसेनासा झाला याचं तिला भीतीमिश्रीत आश्चर्य वाटले.

तिचे पुन्हा मागे वळून बघण्याचे धाडस झाले नाही. ती भेदरलेल्या अवस्थेत दाट शाळूच्या बांधावरून धावतच खळ्याकडे निघाली. लक्षुमनने तांबडं फुटायच्या आधीपासून खळ्यावर चार बैलांची पात धरली होती. मळणी जवळ जवळ उरकत आली होती. खाजवणाऱ्या पांढरी भुशीने तो नखशिखांत माखला होता. कणसापासून दाने मोकळे होऊन रिकाम्या खाकऱ्या दिसत होत्या. लक्षुमनने तिवढ्याचे बैल सोडले.

पोत्याने बैलांच्या अंगावरची भुशी झटकली. त्यांना पाणी पाजून झाडाखाली बांधले. त्यांच्या पुढे बाटकाची पेंढी सोडली आणि अंगातली बंडी झटकली. तेवढ्यात तायबाई धापा टाकत तिथे पोहचली. काय झालं ते नवऱ्याला सांगण्याचे तायबाईला धाडस होईना. पाटीतले कालवण सांडल्याचे लक्षुमनला समजले.

"काय झालं ? पडलीस का वाटंत ? घाबरू नको, मला सांग." तो म्हणाला. तायबाईने धापा टाकीत झालेला प्रकार सांगितला. लक्षुमन हळहळला. "आगं का नाय धिली त्याला भाकर! वाटचा वाटसरू आसला तरी त्याचा जीव जाणायचा आसतोय."

"आवं मी कुडं नाय म्हणले, पण त्यो तिथंच भाकर दे म्हणला."

" बरं मी बगतो त्याला, आसल हितंच शाळूच्या रानात भटकत! तो दिसायला कसा व्हता ते तरी सांग. "

"म्या नीट नाय बघितला, पण दाढीवाला आणिक चिंध्यांची कापडं व्हती त्याच्या अंगात. मला लय भ्याव वाटती, जावद्या तुमी नका जाऊ "

लक्षुमनला झाल्या प्रकाराची चुटपुट लागून राहिली. त्याने पाटीतली रिकामी चरवी उचलली आणि तो तडक निघाला. तायबाई खुळ्यासारखी बघतच राहिली. गावाच्या बाजूने चार पाच पोरांचा घोळका गलका करत येत होता.

"गोधडीबाबा आला ! गोधडीबाबा आला."

त्यांच्या पाठोपाठ गडी आणि बाईमाणसांचा मोठा जमाव येताना दिसत होता. दाट शाळू असलेल्या वावराच्या पलीकडं असणाऱ्या आंब्याच्या झाडाकडे पोरं पळाली. जमावातल्या प्रत्येकाच्या हातात काहीना काही खायचे पदार्थ आणलेले दिसत होते.

लक्षुमनने त्यातल्या एकाला विचारलं, "कुडं चाललाय तुमी सगळी माणसं "

" आरं तुला माहीत नाय का? गाडगे बाबा आल्यात गाडगे बाबा."

लक्षुमनच्या छातीत धस्स झालं. कळत नकळत आपल्या बायकोने फार मोठे पाप केले या विचारांनी त्याला हुरहूर लागली. जमाव पुढे निघून गेला. तो पळतच घरी गेला आणि चरवी भरून दूध घेऊन आला. आंब्याच्या झाडाखाली प्रत्येकाने आणलेली गाठोडी दिसत होती. कुणी भाजी भाकरी आणली होती, कुणी फळे आणली होती. मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर हळहळ दिसत होती. एकच कुजबुज चालली होती.

"गाडगे बाबा कुडं गेलं ! "

`गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला`

या भजनात गुंगवून गाडगेबाबा पसार झाले होते....

(९८५०२४०१३०)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com