Mumbai News : महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता विधानसभेसाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ८ ऑगस्टपासून राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरू होऊन ३१ ऑगस्टला संपेल.
पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ अशा ३९ विधानसभा मतदार संघांत पक्षाचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी (ता.५) पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून जनसन्मान यात्रा काढली जाणार आहे. या वेळी तटकरे म्हणाले, ‘‘लोकशाहीवर दृढ विश्वास असल्याने सरकारने लोकाभिमुख योजना जाहीर केल्या आहेत.
अजित पवारांच्या ३५ वर्षांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ‘जनसन्मान यात्रा’ काढण्यात येणार असून, ती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जाणार आहे. योजनांपुरती यात्रा मर्यादित न राहता समाज घटकांना काय अपेक्षित आहे. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, त्या देखील जाणून घेण्यात येणार आहे.’’
अशी असेल यात्रा...
पश्चिम महाराष्ट्राची यात्रा १५ ऑगस्टपासून सुरू होईल. २२ ऑगस्टपर्यंत ती मुंबईत येईल. त्यानंतर २६ ऑगस्टला विदर्भातून जाणार आहे. पहिल्यांदा सलग पाच दिवसांचा दौरा असणार आहे. दिंडोरी, देवळाली, निफाड, येवला, सिन्नर, अहिल्यानगरमधील कोपरगाव, चांदवड, कळवण, धुळे शहर, अमळनेर, मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदार संघांत जाणार आहे. महायुतीत समन्वय ठेवण्यासाठी प्रत्येक दिवशी महायुतीतील मित्रपक्षातील प्रमुखांशी या वेळी संवाद साधण्यात येईल.
पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी, हडपसर, मावळ, पिंपरी, खेड, आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर या विधानसभा मतदार संघांत, त्यानंतर मुंबई उपनगरमधील बांद्रा ईस्ट, कुर्ला, मानखुर्द - शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, ठाणे जिल्ह्यातील ऐरोली, मुंब्रा- कळवा, भिवंडी ईस्ट, शहापूर या मतदार संघांत नंतर विदर्भातील नागपूर वेस्ट, काटोल, सावनेर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, ब्रह्मपुरी, गडचिरोली, अहेरी या मतदार संघांत ही यात्रा जाणार आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.