
१९६०-७० च्या दशकापासून मी शेतीमधील बदल (Changes In Agriculture) अनुभवतो, पाहतो आहे. आधी विहिरींवरील मोटांवर किंवा अगदी नदीकाठी बागायती पिके (Horticulture Crop) असायची. पण त्यात पैसा नव्हता. पुढे तेलपंप, वीजपंप आल्यानंतर पाइपलाइन दिसू लागल्या. साठच्या दशकात देशाने चीन, पाकशी युद्ध अनुभवले. त्यामुळे शेतीला कमी महत्त्व मिळाले. १९७२ चा भीषण दुष्काळ (Drought) शेतकऱ्यांनी पाहिला. त्यानंतरच शेतीकडे लक्ष दिले गेले.
लालबहादूर शास्त्री, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांनी शेतीला नवे आयाम दिले. शेतीत विज्ञान येऊ लागले. त्यामुळे शास्त्रज्ञांनी संकरित बियाणे आणले. सत्तरच्या दशकात राज्यात चार कृषी विद्यापीठे झाली आणि याच विद्यापीठांतील पहिल्या पिढीने राज्याच्या हरितक्रांतीची पायाभरणी केली. पुढे शरद पवार यांच्या रूपाने द्रष्टा कृषी अभ्यासक नेता लाभला. त्यांनी फळबागा आणून शेती नगदी केली. शेतीत पैसा खेळू लागला. सहकाराने ऊस शेतीला चालना दिली. त्यामुळे काही भागात सुबत्ता आली. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, व्हीएसआय, कोइमतूरचे ऊस पैदास केंद्र, लखनौचे ऊस संशोधन केंद्र या संस्थांनी राज्याची ऊस शेती विकसित केली.
भविष्यातील शेती समजावून सांगण्यापूर्वी मी मुद्दाम तुम्हाला हा प्रवास सांगितला. आता भविष्यातील शेतीबाबत सांगतो. जनुकीय परावर्तित पिकांमुळे (जीएम क्रॉप) शेतीचे भविष्य आणखी उज्ज्वल होईल. या तंत्रज्ञानाने कापूस शेतीत आणलेली क्रांतिकारक आर्थिक उलाढाल आपल्या डोळ्यासमोर आहे. आगामी दोन दशकांत ‘जीएम’सह जागतिक कृषी संशोधन देशभर स्वीकारले जाईल. त्यातून आणखी एक मोठी हरित क्रांती होईल.
पीक उत्पादन वाढेल. पीक संरक्षण सोपे होईल. जैविक निविष्ठांचा वापर व नैसर्गिक शेतीमालाची मागणी वाढेल. शुद्ध व सात्त्विक अन्न वापरणारा वर्ग वाढेल. देशाची लोकसंख्या वाढेल. पण शेतजमीन वाढणार नाही. त्यामुळे उभी शेती (व्हर्टिकल फार्मिंग), मातीविना शेती (हायड्रोपोनिक्स), अतिघनतेची लागवड (हायडेन्सिटी प्लॅन्टेशन) वाढेल. एकरी उत्पादकताही वाढेल. माझ्या मते, कृषी क्षेत्रात जनुकीय अभियांत्रिकीला मोठे महत्त्व येईल. मध्यंतरी ‘मेडिको इंजिनिअरिंग’ (वैद्यकीय अभियांत्रिकी) अशी वेगळी शाखा काढावी, असा एक मतप्रवाह शिक्षण क्षेत्रात आला होता. तसेच कृषी क्षेत्रात जनुकीय अभियांत्रिकीला महत्त्व देणारा विचारप्रवाह येईल.
कृषी विद्यापीठांमधील संशोधन व अभ्यासक्रम जनुकीय बाबींवर अधिक केंद्रित होतील. जगात केवळ भारतातच उत्तम शेतीसाठी तीन ऋतू, हवा, पाणी, भूस्थिती, कृषी वैज्ञानिक आहेत. पण यापुढे शास्त्रीय शेती करणारे शेतकरीही वाढतील. द्राक्ष उत्पादक शेतकरी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. युरोप, इस्राईलचे शेती तंत्रज्ञान आणखी आपल्या जवळ येईल. अन्नद्रव्य व सिंचन व्यवस्थापनात त्यामुळे बदल होतील. अर्थात, शेतीचे तुकडेही वाढतील. त्यामुळे तुकड्यांची शेती अल्पभूधारक शेतकऱ्यांना परवडणार नाही. एकल शेती खर्चीक व तोट्याची असेल. छोट्या शेतकऱ्यांना
आधुनिक तंत्राची, दर्जेदार निविष्ठांची, उच्च विपणनाची शेती अशक्य होईल. त्यामुळे सामूहिक शेतीचा उदय होईल. ती शेती कमी खर्चाची व जास्त नफा देणारी आणि शाश्वत असेल. संस्थात्मक सामूहिक शेती अनिवार्य बनेल. अमूल, गोकुळ, सह्याद्री ही सामूहिक संस्थात्मक शेतीची आदर्श उदाहरणे आहेत. अशा संस्था मोठ्या प्रमाणात वाढतील.
दुसरा महत्त्वाचा बदल होईल तो जैव इंधनात. शेती केवळ फळे, भाजीपाला, अन्नधान्यापुरती मर्यादित राहणार नाही. वनस्पतीपासून इंधन तयार होईल. इथेनॉलने ते सिद्ध केले आहेच. शेती पुढे ऊर्जानिर्मितीचे केंद्र असेल. साखर कारखाने पुढे हरित हायड्रोजन तयार करतील. त्यावर रेल्वे, वाहने, विमाने धावतील. ते दिवस दूर नाहीत. गहू, तांदळाचा भुसा, मळी, बगॅस किंवा कोणतीही हिरवी किंवा वाळलेली वनस्पती वाया जाणार नाही. त्यापासून ऊर्जा तयार होईल. लक्षात ठेवा, की काहीही झाले तरी प्रयोगशाळेत अन्न आणि कारखान्यात भाजीपाला तयार होणार नाही. त्यामुळे काळाची पावले आता आपल्याला वाद तंटेबखेडे बंद करावे लागतील आणि लवकर एकत्र येत सामूहिक शेतीकडे वळावे लागेल. दिवस आपलेच आहेत आणि ते चांगलेच असतील.
(शब्दांकन ः मनोज कापडे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.