
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः गेली तीन आठवडे सतत पडलेल्या परतीच्या पावसाने आलेला व्यत्ययामुळे जिल्ह्यातील साखर कारखाने (Sugar Factory) विलंबाने सुरू झाले आहेत. सध्या १२ कारखान्यांचे गाळप (Crushing) सध्या सुरू झाले आहे. परंतु, शेतात पाणी साचल्याने तोडणी करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे अडचणी येत असून येत्या पंधरा दिवसांनंतर गाळपास गती येणार असल्याची माहिती साखर कारखानदारांना दिली.
यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार साखर कारखान्यांवर ऊस तोडणी मजूर दाखल होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान, जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग आठ-दहा दिवस पाऊस सुरू होता.
परिणामी साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करता आला नाही. त्यामुळे ऊस तोडणी मजूर बसून होते. पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर कारखान्यांनी गाळप सुरू करण्याचे नियोजन केले. त्यानुसार तोडणीचे वेळापत्रकही तयार करण्यास कारखान्यांनी पुढाकार घेतला.
दिवाळीच्या तोंडावर तोडणी यंत्रणाही दबकतच जिल्ह्यात दाखल झाली होती.
परिमाणी या पावसाचा परिणाम हंगामावर होऊन हंगाम लांबत गेला. दिवाळीनंतर ऊस तोडणी सुरू झाली. अजूनही काही शेतांत पावसाचे पाणी साचले आहे. ऊस तोडणी केली तर, उसाने भरलेला ट्रॅक्टर फडातून बाहेर काढता येत नाही. त्यामुळे सध्या रस्त्याकडील ऊस फड तोडण्याचे काम सुरू झाले आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी, अजून गाळपास गती आली नाही. पुढच्या पंधरा दिवसांनंतर गाळपास गती येणार असल्याची शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे लक्ष
सध्यातरी साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असला तरी, एक रकमी एफआरपी जाहीर करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. जिल्ह्यात दत्त इंडियाने एकरकमी ‘एफआरपी’ देऊन ऊस दराची कोंडी फोडली आहे; मात्र, इतर साखर कारखान्यांनी एकरकमी ‘एफआरपी’बाबत अजूनही कोणतही भूमिका घेतली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल असले तरी अजूनही शेतात पाणी आहे. त्यामुळे ऊस तोडणी अडथळे येत आहेत.
- प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी, राजारामबापू साखर कारखाना.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.