
Nashik News : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या टप्पा क्र.१२ अंतर्गत दिलीप बिल्डकॉन कंपनीने दातली ग्रामपंचायतीची १९ लाख रुपये घरपट्टी थकविली आहे. ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्ते, खासगी जागांचा सुमारे सहा वर्षे खोदकामासह, वाणिज्यिक वापर कंपनीने केला आहे.
वारंवार मागणी करूनही कंपनीने ग्रामपंचायतीकडे घरपट्टीचा भरणा केला नाही.यामुळे दिलीप बिल्डकॉनसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि समृद्धी महामार्गासाठी नियुक्त केलेल्या भूसंपादन जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे. ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १२४ चा आधार घेऊन ही नोटीस बजावली असून, दिलीप बिल्डकॉन कंपनीने ग्रामपंचायतीकडे थकित घरपट्टी न भरल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी दगड आणि मुरूम उपलब्ध करण्यासाठी दिलीप बिल्डकॉनने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गट क्र. ३९८ मध्ये २.९८ हेक्टर व गट क्र. ६०६ मध्ये २.५१ हेक्टरवर १०१८ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झालेल्या ग्रामसभांमध्ये खोदकामासाठी ना हरकत दाखला मिळविला होता. खोदकाम शासकीय नियमाच्या अधीन राहून करावे, असे ग्रामसभेने निश्चित केले होते.
त्यानुसार दिलीप बिल्डकॉनने समृद्धी महामार्गासाठी गौण खनिज उपलब्ध करून घेतले होते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागांच्या वापर, तसेच सुमारे सहा वर्षे अवजड वाहनांतून मुरूम, दगड, माती वाहून नेण्यासाठी रस्त्यांचा वापर केल्याबद्दल मे २०२२ मध्ये दातली ग्रामपंचायतीने कंपनीला घरपट्टीचे १९ लाख २०,६०१ रुपयांचे बिल पाठविले होते. मात्र, त्याकडे कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
सप्टेंबर २०२२ मध्ये जप्तीची नोटीस पाठविली होती. तरीही कुठलाही कर भरलेला नाही. दिलीप बिल्डकॉनकडून चालढकल होत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने थकित घरपट्टी वसुलीसाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
समृद्धी महामार्गाच्या कामासाठी शासनाने रॉयल्टी माफ केल्याचे सांगत ग्रामपंचायतींना कर आकारणी करण्याचा अधिकार नाही, असे कारण दिलीप बिल्डकॉनच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आले व ग्रामपंचायतच्या कर मागणी पत्राला ठेंगा दाखविण्यात आला.
घोरवड ग्रामपंचायतच्या हद्दीत समृद्धी महामार्गाचे टप्पा क्रमांक १३ मध्ये बांधकाम करणाऱ्या बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने घोरवड ग्रामपंचायतीला कर मागणीची बिले अदा केली आहेत. दिलीप बिल्डकॉनने दातली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मिळकतींमध्ये खोदकाम करण्यासाठी ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविले.
प्रत्यक्षात नियमाप्रमाणे त्या ठिकाणी सहा मीटर खोलीपर्यंत खोदकाम करणे बंधनकारक असताना, अधिकच्या क्षेत्रात आणि १६ ते २० मीटर खोलीपर्यंत खोलीकरण केले. ही बाब चुकीची आणि बेकायदा आहे. संबंधित शासकीय यंत्रणांनी याची खातरजमा करावी, असेही ग्रामपंचायतीच्या नोटिशीत नमूद केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.