
सिंधुदुर्गनगरी ः नादुरूस्त तळेरे-गगनबावडा महामार्गामुळे यावर्षी देखील ऊसतोडणी (Sugarcane Harvesting) लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे ऊस उत्पादक (Sugarcane Producers) शेतकरी आतापासून आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही तर शेतकरी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. परंतु गळीत हंगामाला सुरुवात झाली असली तरी गेल्यावर्षी प्रमाणेच किंबहुना गेल्यावर्षी पेक्षा अधिक भयावह स्थिती तळेरे-गगनबावडा महामार्गाची झाली आहे. या मार्गावरून वाहतूक करणे सध्या धोकादायक बनलेले आहे.
संपूर्ण महामार्ग खड्डेमय झाला असून काही ठिकाणी दहा ते पंधरा फूट लांबी-रुंदीचे खड्डे पडलेले आहेत. याशिवाय करूळ घाटरस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्यावर्षी रस्ता नादुरूस्त असल्यामुळे ऊसवाहतूक करण्यास ट्रकचालकांनी असहमती दर्शविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत डांबर आणि खडीने खड्डे भरले नाहीत तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
महामार्गाची अवस्था बिकट असून गेल्यावर्षी या महामार्गाच्या दुदर्शमुळे ऊस उत्पादनात ५० टक्के घट झाली होती. परंतु दरवर्षी असे नुकसान होणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणने अंत पाहू नये.
- महेश गोखले, ऊस उत्पादक शेतकरी, नाधवडे
तळेरे-गगनबावडा मार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याचे काम सुरू आहे. परंतु पावसाने उघडीप देताच खडी-डांबराने खड्डे भरण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील प्रकिया सुरू आहे.
- अतुल शिवनिवार,
उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सिंधुदुर्ग
उसाची वेळेत तोडणी झाली तर
शेतकऱ्यांना अनेक अंगाने मदत होते. परंतु रस्ता नादुरुस्तीमुळे ऊसतोडणी वेळेत होत नाही. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे जेणेकरून तोडणी वेळेत पूर्ण होईल. यासंदर्भात आम्ही येत्या एक दोन दिवसांत तहसीलदारांची भेट घेणार आहोत. परंतु दुरुस्ती झाली नाही तर आम्हाला आंदोलन छेडावे लागेल.
- किशोर जैतापकर,
ऊस उत्पादक शेतकरी, नापणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.