
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत वेगाने प्रगती करत आहे. आत्मनिर्भर भारत (Atmnirbhar Bharat) हा केवळ सरकारचा अजेंडा किंवा कार्यक्रम नाही, ती लोकचळवळ आहे. नैसर्गिक शेती (Natural Farming) हा देखील स्वावलंबनाचा मार्ग आहे. नैसर्गिक आणि रसायनमुक्त शेतीमुळे (Chemical Free Agriculture) आत्मनिर्भर होण्याच्या देशाच्या प्रयत्नांना चालना मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना सोमवारी (ता. १५) संबोधित केले. या वेळी विकसित देशासाठी ‘पंचप्राण’ या संकल्पनेची घोषणाही त्यांनी केली. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाहीवर प्रघात करून शेती, आरोग्य, शिक्षण, आयुर्वेद, जीवन पद्धती, निसर्ग, पर्यावरण, तापमान वाढ, सामाजिक एकता आदींना आपल्या भाषणातून स्पर्श केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘नॅनो खत कारखान्यांनी देशात नवा आशावाद निर्माण केला आहे. परंतु नैसर्गिक शेती, रसायनमुक्त शेती आत्मनिर्भर भारताला बळ देऊ शकते. भारत हा अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला आहे. परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत केंद्र सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. देशभरात सुमारे ३० हजार ‘क्लसर्टस’चे निर्माण या योजनेंतर्गत करण्यात आले असून, लाखों शेतकऱ्यांचा याचा फायदा होणार आहे.’’
पंतप्रधान मोदी यांनी शेतीकरिताच्या पाण्याच्या न्याय्य वापरावर आपल्या भाषणात भर दिला. पंतप्रधान म्हणाले, ‘‘प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचविणे हे सरकारचे कर्तव्य आणि काम आहे. मात्र पाणी बचतीकरिता आपल्याला याही पुढे जात ‘प्रति थेंब, अधिक पीक’ धोरण राबवावे लागेल. आपल्या शेतातून ते प्रतितही व्हायला हवे.’’ शिस्तबद्ध जीवन जगताना कर्तव्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक भागात २४ तास वीज पुरवठ्यासाठी प्रयत्नशील असताना, विजेची बचत करणेही गरजेचे आहे, असे ही पंतप्रधान म्हणाले.
‘‘लहान शेतकऱ्यांनी आपल्या छोट्या शेतात पिकवलेली भरड धान्ये ही भारताच्या समृद्ध वारशाचा भाग आहे. २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जग साजरे करण्यासाठी पुढे येत असल्याने देशाला याचा अभिमान वाटावा,’’ असे पंतप्रधान म्हणाले.
‘इथेनॉलमिश्रणाचे उद्दिष्ट वेळेआधीच पार..’
इंधन आयात आणि वापरात भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत आपण उसापासून बनविलेले इथेनॉलचे पेट्रोलमध्ये १० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पार पाडले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी दिली.
ऊर्जा क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. खनिज तेलाकरिता आपण ८५ टक्के आणि गॅसकरिता ५० टक्के आयातीवर निर्भर आहोत. या प्रश्नी पर्यायी ऊर्जा स्रोत ही एक चावी आहे. विद्यमान पेट्रोल आणि डिझेल वाहनांकरिता आपल्याला अपारंपरिक ऊर्जा असलेले हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळावे लागेल.
पंतप्रधान म्हणाले, ‘‘आयात तेलावरील अवलंबित्व कमी करण्याकरिता केंद्र सरकार ऊस आणि इतर कृषी उत्पादनांपासून बनविलेल्या इथेनॉलच्या पेट्रोलमधील मिश्रणाला प्राधान्य देत आहे. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलमिश्रणाकरिता निर्धारित वेळेच्या आधी आपण लक्ष्य गाठले आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत हे लक्ष्य गाठायचे होते, ते आपण जूनमध्येच पार केले आहे. या यशाने प्रोत्साहित होऊन सरकारने २०२५पर्यंतच्या पाच वर्षात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे नवे ध्येय ठरविले आहे.’’
‘पंचप्राण’ संकल्पनेची घोषणा...
पंतप्रधान म्हणाले, ‘‘जेव्हा स्वप्नं मोठी असतात, जेव्हा संकल्प मोठे असतात, तेव्हा ताकदही मोठ्या प्रमाणात एकत्र येते. आज ही अमृतकाळाची पहिली पहाट आहे. आपल्याला आगामी २५ वर्षांत विकसित भारत घडवायचाच आहे. त्यासाठी २०-२२- २५ वर्षांचे युवक माझ्यासमोर आहेत. येणाऱ्या २५ वर्षांत पाच ‘पंचप्राणां’वर आपल्याला शक्ती केंद्रित करायची आहे.’’ विकसित भारत, गुलामीतून मुक्त होणे, वैभवशाली वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि एकजूट ठेवणे, नागरिकांचे कर्तव्य या पाच पंचप्राणांतून आपल्याला विकसित भारत घडवायचा असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
भ्रष्टाचाराविरोधात लढा
भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात भ्रष्टाचाराविरोधात संपूर्ण ताकदीनिशी लढा द्यायचा आहे. यापूर्वीच्या सरकारांच्या काळात जे लोक देशाला लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कितीही अट्टल बदमाश असले तरी ते वाचू शकणार नाहीत. भ्रष्टाचार वाळवीप्रमाणे आपल्या देशाला पोखरतो आहे. मला त्याविरोधात लढा द्यायचा आहे, असे मोदींनी सांगितले.
घराणेशाहीवरही हल्लाबोल
राजकारणात देशातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाही जोपासली आहे. घराणेशाही ही कुटुंबाच्या भल्यासाठी असते, देशासाठी तिचे काही देणेघेणे नसते. याचसाठी देशातील राजकारणाच्या, सर्व संस्थांच्या शुद्धीकरणासाठी, देशाला घराणेशाहीच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवून देण्यासाठी पुढे जायला हवे. घराणेशाहीविरोधातील लढाईमध्ये सहकार्य हवे आहे, अशी सादही नरेंद्र मोदींनी तरुण वर्गाला घातली.
फार्इव्ह जी आणि डिजिटल भारत
नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात ‘५-जी’च्या युगात प्रवेश करत असल्याचे सांगितले. प्रत्येक गावापर्यंत आपण ऑप्टिकल फायबर पोहोचवत आहोत. डिजिटल भारताचे स्वप्न गावांमधून साकार करणार आहोत. भारतातील गावांमध्ये चार लाख कॉमन सर्व्हिस सेंटर विकसित होत असल्याबद्दलही मोदींनी आनंद व्यक्त केला.
ग्रामीण भागामध्ये चार लाख डिजिटल उद्योजक तयार होणे अभिमानास्पद आहे. यावरून तंत्रज्ञानाचे मुख्य केंद्र होण्याची क्षमता अधोरेखित होते. ऑप्टिकल फायबरच्या जाळ्यामुळे शिक्षण, आरोग्य, अवघ्या जीवनातच आमूलाग्र क्रांती घडून येणार आहे. त्यातून नवे विश्व साकारत असल्याचे मोदी म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.