
Wardha News : जागतिक स्तरावर कापूस लागवड क्षेत्र अधिक असले तरी भारताची प्रतिहेक्टरी उत्पादकता कमी आहे. त्यात वाढ होण्याच्या उद्देशाने अतिसघन पद्धतीने कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जात असून हा प्रकल्प कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी व्यक्त केला.
सेलसूरा (वर्धा) केव्हीकेमध्ये आयोजित अतिसघन कापूस लागवड विषयक कार्यशाळेत ते बोलत होते. डॉ. प्रसाद म्हणाले, की देशाच्या आठ कापूस उत्पादक राज्यांमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. महाराष्ट्रात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीज (सिटी सीडीआरए) यांच्या माध्यमातून वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १००१ एकर क्षेत्रात प्रकल्प राबविण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात २७२ शेतकऱ्यांद्वारे ४८६ एकरमध्ये सघन कापूस लागवड करण्यात आली आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी प्रतिएकरी सहा पाकीट बियाण्यांची गरज राहते. तसेच वनस्पती वाढ नियामक (पीजीआर) व एकात्मिक कीड व्यवस्थापन यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाणार आहे.
सिटी सीडीआरचे प्रकल्प समन्वयक गोविंद वैराळे यांनी प्रास्ताविक केले. वर्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर, केव्हीकेचे डॉ. जीवन कतोरे, डॉ. रामकृष्णन, डॉ. रचना पांडे, डॉ. राजकुमार रामटेके, शैलेश गावंडे यांनी मार्गदर्शन केले.
अंकुर सीडचे जनरल मॅनेजर अमोल शिरसाठ, समीर वड्याळकर, गौरव मानकर, आशिष बिसेन उपस्थित होते. प्रगतिशील शेतकरी संजय मडघे, विकास बोंद्रे, उल्हास जैन यांचा गौरव करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.