
ॲग्रोवन वृत्तसेवा
Tomato Rate : नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू. भगरी बाबाधान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवारात चालु हंगामातील टोमॅटो लिलावाचा प्रारंभ बाजार समितचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. मुहूर्तावर गोंदेगाव (ता. निफाड) येथील शेतकरी जालिंदर खामकर यांचा टोमॅटो प्रतिक्रेट ५१०० रुपये दराने दोस्ती ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केला.
लिलावाच्या दिवशी दिवसभरात एकूण २३४ क्रेटमधून टोमॅटोची आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल ५१०० तर सरासरी २६०० रुपये दर मिळाला. प्रारंभी सभापती क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, सदस्य छबुराव जाधव, राजेंद्र बोररगुडे, महेश पठाडे, रमेश पालवे, सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे, टोमॅटो व्यापारी बापू धरम, गणेश देशमुख यांच्या हस्ते टोमॅटो क्रेटचे विधीवत पूजन करण्यात आले. लासलगाव बाजारपेठ कांद्याबरोबर, मका, सोयाबीन, टोमॅटो, डाळिंब व भाजीपाल्यासाठी नावारूपास येत आहे.
त्याचप्रमाणे टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा म्हणून टोमॅटो खरेदीदार, निर्यातदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार असून लिलावानंतर शेतकऱ्यांना तातडीने रोख चुकवती केली जाणार आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले. लिलावात नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खरेदीदार, निर्यातदार व्यापाऱ्यांनी लायसेन्सबाबतच्या सर्व अटी पूर्ण केल्यास त्यांना तत्काळ परवाना देऊन पॅकिंग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपसभापती गणेश डोमाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी टोमॅटो व्यापारी मच्छींद्र काळे, हैदर पठाण, सागर आहेर, संजय साळुंके, सचिन देशमुख, नंदू जाधव, आसिफ पठाण, सुधीर मोरे, शरद हिरे, दीपक केदारे, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सर्व लिलाव प्रमुख सुरेश विखे, पंकज होळकर, संतोष पोटे, हिरालाल सोनारे, स्वप्नील पवार, प्रभारी संजय होळकर, सचिन वाघ, संदीप शेलार, बलराम माठा यांच्यासह टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
टोमॅटो उत्पादकांनी आपला टोमॅटो शेतीमाल मोठा (सुपर/एक नंबर), मध्यम, लहान (गोल्टी), बदला (बिलबिला, तडकलेला, खरचटलेला) अशी योग्य प्रतवारी करून २० किलोच्या क्रेटमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.