
Nashik News : कसमादेत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे गेल्या चार दिवसापासून गिरणा व मोसम या दोन्ही प्रमुख नद्या ओसंडून वाहिल्या. दुथडी भरुन वाहणाऱ्या पुर पाण्याने मालेगावसह अनेक पाणीपुरवठा योजनांना संजीवनी दिली. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरण भरण्यास मदत झाली. पाऊस थांबल्याने गिरणा व मोसमचा पुर देखील ओसरला आहे.
सद्य:स्थितीत हरणबारी धरणातून ८४६ क्युसेक पाणी गिरणा नदीत सोडले जात आहे तर केळझरमधून १९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. चणकापूर धरणातील साठा ९३ टक्क्यावर नियंत्रित करण्यात आला असून धरणातून १ हजार २८० क्युसेक पाणी गिरणा नदीपात्रात सोडले जात आहे.
कसमादेत पाऊस रुसल्याने सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते. गेल्या चार दिवसात झालेल्या पावसाने वातावरण बदलले. मालेगाव शहर व तालुक्यात जेमतेम १५ ते २० मिलिमीटर पाऊस झाला. कळवण, देवळा, बागलाण, चांदवड या भागात बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. कळवण परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने चणकापूर व पुनंद धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग झाला.
त्यामुळे गिरणा नदी प्रथमच दुथडी भरून वाहिली. हरणबारी धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने मोसम नदीला हंगामातील पहिला पुर आला. गिरणा-मोसमच्या पुर पाण्यामुळे गिरणा धरणातील जलसाठा झपाट्याने वाढला. गिरणा धरणात १२ हजार ७१९ दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. यात ३ हजार दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. उपयुक्त जलसाठा ९ हजार ७१९ दशलक्ष घनफूट आहे. धरण ५३ टक्के भरले आहे.
धरणातील जलसाठ्यामुळे मालेगावसह खान्देशमधील विविध गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. चणकापूर मधून सोडण्यात येत असलेल्या पुरपाण्याचा फायदा कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांना होत आहे. हरणबारी, केळझर ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो आहेत. गिरणा ५३, चणकापूर ९३ तर पुनंद धरणात ९२ टक्के जलसाठा आहे. नांदगावमधील नागासाक्या व माणिकपूंज ही दोन्ही धरणे पुरेशा पावसाअभावी कोरडी आहेत.
चणकापूर २४२७ २२५२ ९३
हरणबारी ११६६ ११६६ १००
केळझर ५७२ ५७२ १००
नागासाक्या ३९७ ०० ००
गिरणा १८५०० ९७१९ ५३
पुनंद १३०६ १२०६ ९२
माणिकपुंज ३३५ ०० ००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.