
Jalgaon News : मागील वर्षी खरिपात पिकांची अतोनात हानी झाली. त्यात सुमारे दोन लाखांवर कापूस उत्पादक विमाधारक परताव्यांसाठी पात्र ठरले. परंतु शेतकऱ्यांना परतावे मिळालेले नाहीत.
विमा कंपनीकडे शेतकरी याबाबत विचारणा करतात. पण कंपनीकडून निधीच शासनाने दिलेला नाही. आम्ही यात काही करू शकत नाही, अशी उत्तरे दिली जातात, असे गिरड (ता. भडगाव, जि. जळगाव) येथील शेतकरी समाधान पाटील म्हणाले.
पीकविमा परताव्यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे. कारण शेतकरी कापसाचे कमी दर, नैसर्गिक समस्या यामुळे वित्तीय संकटात सापडले आहेत. आताचा हंगाम शेतकऱ्यांनी उभा केला. परंतु त्यातही कमी पावसाने नुकसान झाले.
विमा कंपनीकडून मागील हंगामाची नुकसान मार्च किंवा एप्रिलमध्येच मिळणे अपेक्षित होते. परंतु यंदाचा खरीप हंगामाचा कालावधी संपत आला तरीदेखील परतावे किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी बँका, सीएससी केंद्रातून अर्ज किंवा प्रस्ताव सादर करून या योजनेत सहभागी झाले आहेत.
पाहणीचा घोळ
जिल्ह्यात जळगाव, यावल, भडगाव, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, भुसावळ आदी भागांत मागील वर्षी अतिपावसात सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले. विमाधारक शेतकऱ्यांनी कापसासह सोयाबीनबाबत तक्रारी विमा कंपनीकडे सादर केल्या. यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी पीकपाहणीसंबंधी किंवा पंचनाम्यांसाठी संबंधित भागात पोहोचले.
परंतु हे पंचनामेदेखील ग्रामपंचायत किंवा चावडीवर बसून करण्यात आले. त्यात मर्जीतील मंडळी, राजकीय मंडळीचे पंचनामे झाले. इतरांना मात्र डावलण्यात आले. अशा शेतकऱ्यांनी आपापल्या भागात तहसीलदार किंवा पीकविमा समितीचे तालुका प्रमुख यांच्याकडे तक्रारी केल्या.
तहसीलदार यांनी बैठका, सभा घेऊन विमा कंपनीला पात्र शेतकऱ्यांना परतावे देण्याचे आदेश दिले. परंतु विमा कंपनीने कार्यवाहीच केलेली नाही. यामुळे २०२२च्या हंगामात योजनेत सहभागी झालेले सुमारे २५ हजार कापूस उत्पादक विमा परताव्यांपासून अजूनही वंचित आहेत, अशी माहिती मिळाली.
लोकप्रतनिधींकडून वरवरची कार्यवाही
शेतकरी याबाबत आपल्या भागातील सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदारांचे स्वीय सहायक किंवा आमदार यांच्याकडे गाऱ्हाणे घेवून जातात. परंतु लोकप्रतिनिधी फक्त विमा कंपनीशी मोबाइलवरून संपर्क साधून सूचना करतात. परंतु नेमक्या अडचणी काय, कोणत्या त्रुटी आढळल्या आहेत, याबाबत कुठलीही माहिती विमा कंपनी देत नाही व त्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.