
Bajari Sowing in Maharashtra : बाजरीच्या पेरणी क्षेत्रात वरचेवर घटच होत आहे. राज्यात यंदा सरासरीच्या ५४ टक्के बाजरीची पेरणी झाली आहे. गतवर्षीपेक्षाही ६३ हजार हेक्टर क्षेत्राने पेरणी कमी झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून मिलेट वर्ष साजरे करत असतानाही झालेली ही घट चिंताजनक आहे.
केवळ दहा जिल्ह्यांत बाजरीचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. अन्य जिल्ह्यांतील बाजरीचे क्षेत्र बोटावर मोजण्याएवढे आहे. गेल्या २२ वर्षांचा विचार करता बाजरीचे राज्यात सुमारे १४ लाख हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे.
नगर, नाशिक, विदर्भातील काही जिल्हे, मराठवाडा, सोलापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांसह इतर भागांतही पूर्वी खरिपात बाजरीचे उत्पादन घेण्याला प्राधान्य दिले जात होते. मात्र काही वर्षांपासून बाजरीच्या क्षेत्रात कमालीची घट होत आहे. सध्या बाजरी खाण्याला प्राधान्य दिले जात असून, बाजरीचे पेरणीक्षेत्र घटतेय ही चिंतेची बाब आहे.
राज्यात २२ वर्षांपूर्वी खरिपात १८ लाख हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जायचे. त्यात टप्प्याटप्प्याने घट होत बाजरीचे क्षेत्र कमी होऊन दहा वर्षांपूर्वी १५ लाखावर आले. पाच वर्षांपूर्वी सात ते आठ लाखांवर आले. यंदा आतापर्यंत केवळ ३ लाख ६० हजार १९८ हेक्टर बाजरी पेरली आहे. यंदा सहा लाख ६९ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. तुलना केली तर गेल्या वर्षी ७४ टक्के तर यंदा ५४ टक्के पेरणी झाली. गतवर्षीपेक्षा यंदा ६३ हजार हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.
यंदा केवळ दहा जिल्ह्यांतच बऱ्यापैकी बाजरीची पेरणी झाली. यंदा सर्वाधिक नगर जिल्ह्यात ८१ हजार हेक्टर, त्यापाठोपाठ नाशिकला ५६ हजार हेक्टर, धुळ्याला ३४ हजार हेक्टर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत प्रत्येकी २३ हजार हेक्टर, बीड जिल्ह्यात ३७ हजार ५०० हेक्टर, सातारा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टर, सांगलीत ३० हजार हेक्टर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
राज्यात १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर खरिपाचे सरासरी क्षेत्र आहे. यंदा त्यापैकी आतापर्यंत १ कोटी ४० लाख ७६ हजार ६६३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आहारात तृणधान्याचा वापर वाढावा, यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न आहेत.
देशात यंदा तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. तृणधान्यात सर्वाधिक क्षेत्र बाजरीचे आहे. मात्र यंदा खरिपातील पेरणीक्षेत्राचा विचार करता बाजरीचे क्षेत्र सरासरीच्या केवळ २.६ टक्के असणे चिंतेची बाब आहे.
- २०१७-१८ ः ७.८८
- २०१८-१९ ः ६.०९
- २०१९-२० ः ६.७२
- २०२०-२१ ः ६.८७
- २०२१-२२ ः ६.४४
- २०२२-२३ ः ४.०३
- २०२३-२४ ः ३.६० (२३ ऑगस्टपर्यंत)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.